अतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : कामावरुन परतणाऱ्या तरुणीची छेड (Crime News) काढल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये (Kalyan News) घडलाय. यावेळी तरुणीची मदत करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीनंतर दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी (Kalyan Police) याप्रकरणी प्रणव कोनकर याच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
कल्याणमधील मंगेशी पॅराडाईज परिसरात हा सर्व प्रकार घडला आहे. कामावरुन परतणाऱ्या तरुणीची छेड काढल्यानंतर दोन तरुणांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र छेड काढणाऱ्या तरुणांनी दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. योगेश चौधरी आणि उत्कर्ष सिंग अशी या तरुणांची नावे आहेत. दोघांवर केडीएमसीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्व प्रकारानंतर खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पश्चिमेत राहणारी ही 22 वर्षीय तरुणी कामावरुन रात्री घरी परतत होती. या तरुणीला भररस्त्यात प्रणव कोनकर याने अडवत तिची छेड काढली. यानंतर तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर योगेश आणि उत्कर्ष हे दोघेही मदतीसाठी धावून आले. त्यांनी तरुणीला आरोपीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. याच रागातून प्रणव कोनकरने त्याच्या मित्रांना बोलवून घेतले. मित्र तिथे येताच त्यांनी दोघांना लाकडी दांडके आणि बॅटने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत योगेशचे डोके फुटले आहे. तर उत्कर्ष याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या दोघांना रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी प्रवण कोनकर याच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
"कामावरुन घरी जात असताना आरोपीने मला अडवून तू कुठे गेली होतीस असे विचारण्यास सुरुवात केली. तू कामाला नाही तर दुसऱ्या कोणासोबत गेली होतीस असे म्हणायला लागला. त्यानंतर मला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे मी बाजूने जाणाऱ्या मुलांकडे मला वाचवा म्हणत मदत मागितली. ते मदतीसाठी पुढे आल्यावर आरोपीने त्याच्या भावंडांना बोलवून सगळ्यांना मारहाण केली," असे पीडित तरुणीने सांगितले.