शिवसेनेकडून २८८ जागांवर इच्छुकांच्या मुलाखती

 शिवसेनेने सर्वच्या सर्व जागांवर इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरूवात केली आहे. 

Updated: Sep 15, 2019, 02:48 PM IST
शिवसेनेकडून २८८ जागांवर इच्छुकांच्या मुलाखती title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं सर्वच्या सर्व २८८ जागांवर इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरूवात केली आहे. जागावाटपाबाबत भाजपशी सध्या बोलणी सुरू नसल्याने २८८ जागा लढवण्यासाठी शिवसेनेने चाचपणी सुरू केली. मातोश्रीवर रविवारी दिवसभर इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. 

दरम्यान, या मुलाखती सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे नीरज गुंडे मातोश्रीवर पोहोचले. नीरज गुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही मित्र आहेत. गुंडे हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मातोश्रीवर पोहोचल्याची चर्चा आहे.

युतीची घोषणा १९ सप्टेंबरला होईल - प्रसाद लाड

दरम्यान, याबाबत विचारणा केली असता, चहा पिण्यासाठी मातोश्रीवर आलोय, असे उत्तर नीरज गुंडे यांनी दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने २८८ जागांवर मुलाखती घेतल्याचे आपल्याला माहिती नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला. विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच पुन्हा यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात बोलत होते. महायुतीच सत्ता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसेच महायुतीचे जागावाटप लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.