मुंबई : Hanuman Chalisa controversy: अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांना रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णलयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना त्या म्हणाल्या, तुरुंगात आपल्याला अन्यायकारक वागणूक दिली गेली आहे. मी याबाबत दिल्लीत तक्रार करणार आहे. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. माझ्याविरोधात राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक जिंकून दाखवावी, असे त्या म्हणाल्या. आपल्याला तुरुंगात डांबले. मी काही घाबरत नाही. 14 दिवस नाही तर 14 वर्षे जेलमध्ये राहण्यास तयार आहे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
ठाकरे सरकारवर निशाणा साधताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, 'माझा महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारला प्रश्न आहे की, मी अशी कोणती चूक केली, ज्याची शिक्षा मला झाली. जर हनुमान चालीसा आणि रामाचे नाव घेणे गुन्हा असेल तर मी 14 दिवस नाही तर मी 14 वर्षे जेलमध्ये राहू शकते. ठाकरे सरकार महिलेचा आवाज दाबू शकत नाही.
आमचा लढा हा देवाच्या नावाचा लढा आहे. यापुढेही हा लढा सुरुच राहणार आहे. माझ्यावर क्रूर कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा दुरुपयोग केला. तुरुंगात माझा छळ झाला. माझ्यावर कितीही संकटे आली तरी मी संकटमोचनाचे नाव घेणे सोडणार नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या.
मी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करते. तुरुंगापासून लॉकअपपर्यंत माझा छळ झाला. मी आजारी होते. त्यानंतर मला उपचारासाठी नेण्यात आले. याशिवाय उद्धव ठाकरे यांना वारसाहक्काने सत्ता मिळाली आहे. ते जनतेतून निवडणूक येऊ शकत नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या.