मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. कोठडीत पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे, तसंच मागासवर्गीय असल्याने पाणी दिलं गेलं नाही, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला असून यासंदर्भात त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे.
तसंच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावरही कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून माझ्यावर आणि पतीवर कारवाई करण्यात आल्याचं नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
लोकसभा अध्यक्षांनी महाराष्ट्र सरकारकडे २४ तासांच्या आत तपशील मागवला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
नवनीत राणा यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं सिद्ध झाल्यास राणा यांच्यावर कारवाई करणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. राणा यांना कोठडीत पाणी दिलं नाही तसंच जातीवाचक उल्लेख केला असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. त्यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रही पाठवलंय.
मात्र हे आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं तर नवनीत राणांवर कारवाई करू असा इशारा गृहखात्याने दिलाय. तसंच गृहमंत्र्यांनीही हे आरोप फेटाळलेत.पोलीस ठाण्यातील वागणुकीसंदर्भात आपण चौकशी केली असून तशी वस्तूस्थिती दिसत नाही, तरीही त्याचा तपशील लोकसभा अध्यक्षांना पाठवणार असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच
मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्याने त्यांचा मुक्काम जेलमध्येच असणार आहे. राणा दाम्पत्य यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिलला मुंबई सत्र न्यायालय सुनावणी करणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या याचिकेवर 29 एप्रिल पर्यंत उत्तर देण्यासाठी सरकारला न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानंतर जामिनावर सुनावणीची तारीख देण्यात येणार आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडून वेळ मागितला होता. त्यांची मागणी न्यायालयाने मान्य करत सरकारला उत्तर देण्यात सांगितले आहे.