मुंबईत रंगाचा बेरंग; १२ जखमी, थंडाईतून दोघांना विषबाधा

धुळवड उत्साहात सुरू असताना काही ठिकाणी रंगाचा बेरंग झाला आहे. 

Updated: Mar 21, 2019, 06:07 PM IST
मुंबईत रंगाचा बेरंग; १२ जखमी, थंडाईतून दोघांना विषबाधा  title=
संग्रहित छाया

मुंबई : धुळवड उत्साहात सुरू असताना काही ठिकाणी रंगाचा बेरंग झाला आहे. पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी परिसरात होळी साजरी करताना काही अतिहौशी लोकं जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पोलिसांनी तळीरामांविरोधात मोहीम उघडली असून पोलीस ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करत आहेत. मुबईत धुळवड साजरी करताना १२ जण जखमी झालेत. अतिउत्साही लोकांमुळे होळीच्या रंगाचा बेरंग होताना दिसत आहे.थंडाईतून दोघांना विषबाधा झाली आहे. तसेच होळी खेळताना पडून जखमी झालेल्या रुग्णांवरही उपचार सुरु आहेत.

धुळवडीच्या दिवशी रासायनिक रंगाचा वापर करू नका फुग्यांचा वापर करू नका, असे पोलीस प्रशासनाकडून तसेच इतर सामाजिक संस्थांकडून वारंवार सांगून देखील अनेकांनी याकडे कानाडोळा केल्याचं दिसत आहे. धुळवडीचा सण साजरा करताना जखमी झालेल्या १२ रुग्णांना पूर्व मुंबई उपनगरातल्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात फुगा लागून एकजण जखमी झाला. तर थंडाईतून दोघांना विषबाधा झाली आहे. तसेच होळी खेळताना पडून जखमी झालेल्या रुग्णांवरही उपचार सुरु आहेत. त्यामुळे धुळवड खेळताना रंगाचा बेरंग होऊ नये याची खबरदारी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन करण्यात येत आहे. 

धुळवडी दरम्यान तळीरामांवर कारवाईचा बडगा मुंबई पोलिसांनी उचलला आहे. ठिकठिकाणी नाकेबंदी करून तळीरामांवर आणि वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतायेत. आजच्या दिवशी नशेत गाड्या चालवण्याचं प्रमाण खूप असते. त्यात अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून ही विशेष मोहीम राबवली जात आहे.