'भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात भिडेंविरूद्ध आरोपपत्र दाखल करा'

 11 नोव्हेंबर पर्यंत सर्व आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करावे असे आदेश 

Updated: Sep 16, 2019, 06:21 PM IST
'भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात भिडेंविरूद्ध आरोपपत्र दाखल करा' title=

बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी उर्फ मनोहर भिडे आणि इतर आरोपी विरोधातील तपास लवकरात लवकर पूर्ण करून 11 नोव्हेंबर पर्यंत सर्व आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करावे असे आदेश आज मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी आज दिले आहेत. 

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती. या दंगल प्रकरणात अनिता साळवे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मिलिंद एकबोटे, मनोहर भिडे आदी आरोपी आहेत. एकबोटे याच्यावर कारवाई झाली आहे. त्याला अटक झाली आहे. काही महिने तो जेलमध्ये होता. मात्र मनोहर भिडे यांच्यावर अजून कोणतीच कारवाई झालेली नाही. यामुळे मनोहर भिडे यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आहे. 

या याचिकेची दाखल घेऊन कोर्टाने एप्रिल 2019 रोजी पुणे ग्रामीण पोलीस, राज्य सरकार यांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 16 जून 2019 रोजी पुणे ग्रामीण पोलिसांनी आपण या प्रकरणात करवाई करणार आहोत. तपास सुरू आहे, अशी माहिती कोर्टाला दिली होती. यावेळी कोर्टाने 'तुम्हाला तपास पूर्ण करायला कीती वेळ लागणार आहे ? तुम्हीं कधी आरोपपत्र दाखल करणार ?' अशी विचारणा केली. 

'आम्हाला अजून तीन महिने तपासाठी लागतील, त्यानंतर आम्ही आरोपपत्र दाखल करू' असे त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं. मात्र तीन महिन्यांनंतरही पोलिसांनी आरोप पत्र दाखल केल नाही. यामुळे कोर्टाने तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी पुढील तीन महिन्यात भिडे आणि इतर आरोपीवर कारवाई करावी, त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करावे असे आदेश न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठाने 16 जून 2019 रोजी दिले होते.