मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणात जोरदार पाऊस पडत आहे.  

Updated: Jun 9, 2021, 06:50 AM IST
मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा title=

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळी सहानंतर पाऊस थांबला आहे. दरम्यान, ठाणे, नवी मुंबईत मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, आजपासून 12 जूनपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून चार दिवसांच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, पालघर, जोगेश्वरी, अंधेरी, कांदवली, बोरवली, नालासोपारा, वसई याठिकाणी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत होता. आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. तर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. पुढील तीन दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोणीही समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेच अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सूचना करण्यात आली आहे. किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्याण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईत सायन परिसरात पाणी साचले होते. रात्रभर सुरु असलेला पाऊस असाच कोसळत राहीला तर मुंबईत सकल भागात पाणीसाचण्याचा मोठा धोका आहे. तसेच लोकल वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, सकाळी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सकल भागात पाणी साचण्याचा धोका टळला आहे. पाणी साचणारी ठिकाणे लक्षात घेऊन काही ठिकाणी पंपबसविण्यात आले आहेत.