MS Dhoni : आधी पंत आणि आता धोनीच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया, पाहा कोण आहेत 'ते' नामांकित डॉक्टर

MS Dhoni Surgery: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नईने बाजी मारली. पण चेन्नईच्या विजयाला चोवीस तासाच्या आतच वाईट नजर लागली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

राजीव कासले | Updated: Jun 1, 2023, 06:28 PM IST
MS Dhoni : आधी पंत आणि आता धोनीच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया, पाहा कोण आहेत 'ते' नामांकित डॉक्टर title=

MS Dhoni Surgery: आयपीएल स्पर्धेदरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) गुडघ्याला दुखापत (Knee Injury) झाली. 29 मेला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल ट्रॉफी (IPL Trophy) जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 मे रोजी धोनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) धोनीच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया (knee surgery) करण्यात आली. कोकिलाबेन रुग्णालयाचे अस्थीरोग विभागाचे संचालक डॉक्टर दिनशॉ पारदीवाला (Dr Dinshaw Pardiwala) यांनी ही शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे डॉ. पारदीवाला यांनीच रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या क्रिकेटर ऋषभ पंत यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली होती. डॉ. पारदीवाला कोकिलाबेन रुग्णालयातील सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसिनचे प्रमुख आहेत. 

कोण आहेत डॉ. पारदीवाला?
डॉ. पारदीवाला यांना जवळपास 23 वर्षांचा आर्थोस्कोपिक सर्जरी करण्याचा अनुभव आहे. त्यांना आयसीसीच्या वैदयकीय समितीचे सदस्य म्हणूनही नियुक्त करण्यात आलं आहे. अस्थिरोगाशी संबंधीत अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया डॉ. पारदीवाला यांनी पार पाडल्या आहेत. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना 2009 साली इसाकोस जॉन जॉयसने सन्मानित करण्यात आलं आहे. डॉ. पारदीवाला यांनी अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर उपचार केले आहेत. यात युवराज सिंह, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. 

इंडियन आर्थोस्कोपी असोसिएशनचे सदस्य
डॉ. पारदीवाला इंडियन आर्थोस्कोपी असोसिएशनचे सदस्य आहेत. अमेरिकन जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन सारख्या दैनिकांच्या संपादकीय समितीचे सदस्यही राहिले आहेत. क्रिकेटपटूंबरोबर इतर खेळांच्या बोर्डाचेही ते डॉक्टर म्हणून काम पाहातात. 2018 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंपैकी 12 खेळाडूंवर डॉ. पारदीवाला यांनी उपचार केले आहेत. अस्थिरोगाशी संबंधित त्यांच्या अनेक संशोधनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. 

क्रिकेटर्सव्यतिरिक्त कुस्तीपटू सुशील कुमार, बॉक्सर विकास कृष्णन, बॅडमिंटन खेळाडू पी वी सिंधू, कुस्तीपटू योगेश्वर दत्तसह अनेक खेळाडूंवर त्यांनी उपचार केले आहेत. 

'या' शस्त्रक्रियेत माहिर
डॉ पारदीवाला हे एसीएल सर्जरी, गुडघ्याची समस्या अस्थिबंधन पुनर्रचना शस्त्रक्रिया यासह विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात माहिर आहे.

धोनी पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार
आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु होण्यापूर्वी एम एस धोनीची ही शेवटची स्पर्धा असणार अशी चर्चा होती. चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळालं. पण स्वत: धोनीने या सर्व शक्यात फेटाळून लावल्या आहेत शरीराने साथ दिली तर आपण आयपीएलचा पुढचा हंगामही खेळू असं धोनीने म्हटलं आहे. चेन्नईचे सीईओ विश्वनाथन यांनीही आयपीएलमधून निवृत्ती घ्यायची कि नाही हा संपूर्ण धोनीचा निर्णय असल्याचं म्हटलं आहे.