मुंबई: एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ते बुधवारी मुंबईच्या कमला मिल परिसरातील त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर संशयास्पदरित्या गायब झाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तविली होती. यानंतर केलेल्या तपासादरम्यान पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. यापैकी एका संशयिताने सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
सिद्धार्थ संघवी हे एचडीएफसी बँकेच्या कमला मिल येथील कार्यालयात काम करायचे. बुधवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी मलबार हिल येथून निघाले. पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह ते मलबार हिल येथे राहतात. रात्री दहापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी सिद्धार्थ हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास कमला मिल येथून निघाल्याचे सांगितले.
यानंतर सिंघवी यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान गुरुवारी त्यांची मारुती कार नवी मुंबईत सापडली. या कारमध्ये रक्ताचे डाग सापडले होते.