गुवाहाटी मॅरेथॉन कठीण होती पण जिंकली, 30 वर्षांच्या धावाधावी नंतर मुख्यमंत्री झालो- CM शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना 30 वर्ष धावाधाव केल्यानंतर मुख्यमंत्री झाल्याचं म्हटलं आहे.

Updated: Aug 10, 2022, 11:20 PM IST
गुवाहाटी मॅरेथॉन कठीण होती पण जिंकली, 30 वर्षांच्या धावाधावी नंतर मुख्यमंत्री झालो- CM शिंदे

मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा हर दिल मुंबईचा नारा देण्यात आला आहे. १५ जानेवारी २०२३ रोजी मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राजकीय मॅरेथॉनबाबत ही मोठे वक्तव्य केले आहे.

'मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल हे 18 किलोमीटर धावले आहेत. त्यांचे अभिनंदन. आम्हीही मॅरेथॉन धावून जिंकून आलो. मुंबई-गुवाहाटी-सुरत, कठीण मरेथॉन होती मात्र आम्ही ती जिंकली. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

जगभरातील धावपटू या मॅरेथॉनची वाट बघत असतात. कोरोनामुळे गेले दोन वर्ष मॅरेथॉन होऊ शकली नाही. 50 हजारांहून अधिक लोक ही मॅरेथॉन धावतात हे मोठे यश आहे. मुंबई देशासाठी अभिमानाची बाब आहे. मॅरेथॉनचे उदघाटन झाले असे मी जाहीर करतो. मॅरेथॉन सर्वांना एका व्यासपीठावर आणते, सर्व स्तरातील लोक एकत्र येतात ही मोठी गोष्ट आहे. असं ही मुख्यमंत्री म्हणाले. 

'चहल धावतात, राजकारणी धावतात, धावायला लावतात. आम्हाला पहिल येऊनही काही मेडल मिळत नाही. आम्ही अंधारात धावतो, गुवाहाटी मॅरेथॉन कठीण होती पण जिंकली, 30 वर्षांच्या धावाधावी नंतर मी मुख्यमंत्री झालो.' असं देखील त्यांनी म्हटलंय.

'पंतप्रधानांना भेटलो, ते म्हणाले सर्वांना न्याय देणारे सरकार असावे. विधानसभेमधील माझं सारं भाषण पंतप्रधान यांनी ऐकले असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी आहे. डबल इंजिनचे हे सरकार धावेल. आम्हाला हाफ मरेथॉनचे तिकीट मिळाले कारण अडीच वर्षच आहेत, पुढच्या वेळी फुल मॅरेथॉनचे तिकीट मिळेल. सरकार, पालिका, पोलीस सर्वांकडून मॅरेथॉनला सहकार्य मिळेल, सरकार तुमच्या बरोबर आहे.'