बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : आयएलएफएस कंपनीच्या चौकशी दरम्यान कोहिनूर CTNL infra कंपनीचा घोटाळा समोर आला. यामध्ये सक्तवसुली संचालनालयाने राज ठाकरे, उन्मेष जोशी, आणि विकासक राजन शिरोडकर यांना समन्स बजावलं. पण ही चौकशी नेमकी कशासाठी सुरू आहे. पाहा झी २४ तासचा हा एक्सक्लूझिव्ह रिपोर्ट.
दादरच्या अगदी महत्त्वाच्या ठिकाणी असलेला कोहिनूर टॉवर, ज्याच्यावरुन सध्या राज ठाकरे, उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांच्या ईडीच्या फेऱ्या सुरू आहेत.
कोहिनूर कॉन्टिनेन्टल इन्फ्रास्ट्रक्चर ही कोहिनूर ग्रुपची उपकंपनी आहे. कोहिनूर मिल नंबर ३ खरेदीच्या उद्देशानं कंपनीची स्थापना झाली. राज ठाकरे, उन्मेष जोशी, विकासक राजन शिरोडकर या तिघांनी मिळून ही उपकंपनी बनवली. मिलच्या जागी कोहिनूर स्क्वेअर ही उत्तुंग इमारत उभारायची होती. त्यासाठी ४२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.
आयएल अँड एफएसने २००३ साली कोहिनूर कॉन्टिनेन्टलमध्ये २२५ कोटी रुपये समभाग खरेदी करुन भांडवली गुंतवणूक केली. कामाला सुरुवात झाल्यावर कोहिनूर कॉन्टिनेन्टलने वेगवेगळ्या कारणांसाठी आणखी २२ उपकंपन्या उभ्या केल्या. असा त्यांच्यावर आरोप आहे. या उपकंपन्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे दिले गेले. ते पैसे वेगवेगळे बांधकाम साहित्य खरेदीच्या नावाखाली देण्यात आले.
२००८ साली हेच समभाग १३५ कोटींचा तोटा सहन करुन ९० कोटी रूपयांना विकल्याचे उघड झालं.
२००८ ते २०१० दरम्यान आयएल अँड एफएस कंपनीने पुन्हा १३५ कोटी कर्ज बुडीत असलेल्या कोहिनूर कॉन्टिनेन्टल कंपनीला दिले.
याआधीच आयएल अँड एफएसने कोहिनूर बुडीत कर्ज दाखवून कर्जाचे प्रकरण बंद केलं होतं.
तरीही २०१८ पर्यंत ८६० कोटी रूपये कर्ज कसं काय दिलं यावरूनच या प्रकरणाच्या तपासला सुरुवात झाली.
आयएल अँड एफएसच्या लेखापरिक्षणात १३ हजार कोटींचा गैरव्यवहार असल्याचं समोर आलं.
त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने हे प्रकरण हातात घेत कागदपत्रे तपासली. यात या उपकंपन्यांचा कोणताही उल्लेख नव्हता
तपासादरम्यान उपकंपन्यांची वेगळी यादी असल्याचं ईडीच्या लक्षात आलं.
छाननीदरम्यान उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांच्या आर्थिक ताळेबंदीत तफावत दिसली.
राज ठाकरेंच्या चौकशीनंतर आता सोमवारी पुन्हा उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची चौकशी ईडी करणार आहे.