मुंबई : राज्यात मोठी राजकीय घडामोड झाल्यानंतर आता पु्न्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीने अजित पवारांची विधीमंडळनेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्याचवेळी राज्यात पुन्हा निवडणूक झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची विकासमहाआघाडी एकत्र राहतील आणि त्यांचा पराभव केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
अजित पवारांनी सह्यांचं पत्र देऊन राज्यपालांची फसवणूक केली. पक्षाच्या धोरणाविरोधात अजित पवार यांनी निर्णय घेतला आहे. सामान्य जनता राष्ट्रवादीसोबत आहे. त्यांनी राजीनामा दिला तर त्यांचा पराभव आम्ही करु, असे शरद पवार म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. असे असलेतरी आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी काय तो निर्णय दिसेल, असे पवार यांनी संकेत दिले.
महाराष्ट्रात जनमत जे आहे ते भाजपाच्या विरोधात आहे. असे असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध दर्शवेल असंही शरद पवार यांनी म्हटले आहे. १० ते ११ सदस्य त्यांच्यासोबत गेल्याचे समजते आहे. जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचे ते करु , असेही पवार यांनी सांगितले.