मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईसह (Mumbai) राज्यातही विविध ठिकाणी लसीकरण (Corona Vaccination) मोहिम राबवली जात आहे. अनेक नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला तसेच दुसरा डोस (Corona First And Second Dose) घेतला आहे. मात्र लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं उघडकीस आलं आहे. फक्त मुंबईत 23 हजार 239 लसवंताना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी या लशी प्रभावी नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Even after corona first and second doses in Mumbai total 23 thousand 239 vaccinetd people is infected with corona)
या 23 हजार 239 कोरोनाबाधित लसवंतांपैकी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ही 14 हजार 239 इतकी आहे. तर दोन्ही लस घेतलेल्यांचा हा आकडा 9 हजार इतका आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये लस घेतल्यानंतर कोरोना होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्याने लस प्रभावी नाहीये का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
चीनमध्ये पुन्हा कोरोना
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चीनच्या दक्षिण-पूर्व फुजियान भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुतियान शहरातील चित्रपटगृह, जीम, महामार्ग बंद करण्यात आले आहेत. तसंच, रहिवाशांना शहर न सोडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.