'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट स्थिती करेन' सलमान खानला धमकी देणाऱ्याचा युटर्न, आधी मेसेज पाठवला आता मागितली माफी

Salman Khan Threat : मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानला धमकी देणारा एक मेसेज पाठवण्यात आला होता. या मेसेजमध्ये बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट स्थिती करु अशी धमकी सलमान खानला देण्यात आली होती. धमकीचा मेसेजे पाठवणाऱ्याने आता माफी मागितली आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 21, 2024, 08:41 PM IST
'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट स्थिती करेन' सलमान खानला धमकी देणाऱ्याचा युटर्न, आधी मेसेज पाठवला आता मागितली माफी title=

Salman Khan Threat : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानला (Salman Khan) धमकी मिळाली होती. धमकी देणाऱ्याने सलमान खानकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकीचा हा मेसेज आला होता. आता धमकी देणाऱ्याने आणखी एक मेसेज पाठवला असून त्याने आपली चूक झाल्याचं मान्य करत माफी मागितली आहे. भावनेच्या भरात आपण हा मेसेज पाठवल्याचं त्याने म्हटलंय. मुंबई पोलिसांनी धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याचा मोबाईल नंबर ट्रेस केला असून त्याचं लोकेशनही शोधलं आहे. धमकीचा हा मेसेज झारखंडमधून (Jharkhand) पाठवण्यात आला होता. 

पाच कोटी रुपयांची मागणी
आरोपीच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांचं एक पथक झारखंडसाठी रवाना झालं आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर आलेल्या मेसेजमध्ये आरोपीने स्वत:ला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा केला होता. आपल्या मेसेजमध्ये त्याने ही गोष्ट मस्करीत घेऊ नका, सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट करेन असं लिहिलं होतं. याबरोबर आरोपीने प्रकरण मिटवण्यासाठी सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईमध्ये मध्यस्थी करु शकतो, यासाठी सलमान खानला पाच कोटी रुपये द्यावे लागतील असं म्हटलं होतं. 

झारखंडमध्ये सापडलं लोकेशन
हा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले. मुंबई पोलिसांनी तात्काळ अॅक्शन घेत धमकी पाठवण्याऱ्याचा मोबाईल नंबर ट्रेस केला आणि तपास सुरु केला. यात धमकी पाठवणाऱ्याचा मोबाईल नंबर झारखंडमधला असल्याचं समोर आलं. आरोपीचा नंबर ट्रेस झाल्यावर पोलिसांचा एक पथक झारखंडला रवाना झालं आहे. यादरम्यान त्याच आरोपीचा दुसरा मेसेज मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअप नंबरवर आला. यात आपण माफी मागत असल्याचं आरोपींनी म्हटलंय.

लॉरेन्स बिश्नोईचा सलमानवर राग
आपल्या मेसेजने आरोपीने माफी मागत चूक झाल्याचं मान्य केलंय. देशभरात सलमान आणि बिश्नोईच्या वादाची चर्चा रंगली आहे. यामुळे आपणही भावनेच्या भरात सलमानला धमकी दिली. पण आता मला माझ्या चुकीचा पश्चाताप होतोय असं धमकी पाठवणाऱ्याने म्हटलंय. 

सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातला वाद 26 वर्ष जुना आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केली होती. तेव्हापासून बिश्नोई गँगचा सलमान खानवर राग आहे. बिश्नोई समाजाकडून काळवीटाची पूजा केली जाते.