मुंबई : तुकाराम मुंढे हे आयएएस अधिकारी आहेत, ते काम करत असताना कोणताही हितसंबंध जोपासत नाहीत. प्रामाणिकपणा, सत्य आणि बेडर अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे, मात्र याचा त्यांना तेवढा त्रास देखील आपल्या सेवाकाळात झाला आहे, पण सर्वसामान्य लोकांच्या कामी प्रशासन असावं, त्यांना केंद्रबिंदू मानून शासन चालावं असं त्यांना वाटतं.
तुकाराम मुंढे यांच्या १२ वर्षाच्या सेवेत आतापर्यंत ९ वेळा बदल्या झाल्या आहेत. तुकाराम मुंढे यांना अनेकवेळा, निनावी लेखी धमक्या देखील आलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसांना तुकाराम मुंढे यांना भिण्याचं कारण नाही, कारण ते सतत कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कामावर लक्ष ठेवतात, सर्व सामान्यांची सोय व्हावी म्हणून.
तुकाराम हरिभाऊ मुंढे यांचा जन्म ३ जून १९७५ रोजी बीड जिल्ह्यातील ताडसुन्ना या छोट्याशा गावी झाला. मुंढे आणि त्यांचे बंधू यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं. मुंढेंनी इतिहास-सामाजिक शास्त्र विषयात बीए केलं. यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यशास्त्र विषयात एमए केलं.
तुकाराम मुंढे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत, त्याआधी तुकाराम मुंढे यांचे वडील सावकारी कर्जात बुडालेले होते. आयएएस परीक्षेचा निकाल लागण्याआधी २ महिने जळगावात त्यांनी व्याख्याता म्हणून काम केलं.