EC Shivsena Verdict: "खरा धनुष्यबाण माझ्याकडे", म्हणत उद्धव ठाकरेंनी दाखला 'तो' खास धनुष्यबाण

Uddhav Thackeray Says I have real dhanushyaban: मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उद्धव यांनी हा खास धनुष्यबाण पत्रकारांना दाखवला आणि त्याचं महत्त्वही त्यांनी सांगितलं.

Updated: Feb 17, 2023, 09:45 PM IST
EC Shivsena Verdict: "खरा धनुष्यबाण माझ्याकडे", म्हणत उद्धव ठाकरेंनी दाखला 'तो' खास धनुष्यबाण title=
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray on EC Shivsena Verdict: केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि 'शिवसेना' हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबईमधील शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन खरा धनुष्यबाण आपल्याकडे असल्याचं म्हणत एक छोटा धनुष्यबाण पत्रकारांना दाखवला. हा धनुष्यबाण फार खास असल्याचंही उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना सांगितलं.

"लोकशाहीच्या दृष्टीने घातक निर्णय घेण्यात आला आहे.. दुर्देवाने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव सुरु असताना आपल्या माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन घोषणा करायला हरकत नाही 75 वर्षांचं स्वातंत्र्य संपलेलं आहे. देशातली लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे.  अनेक उदाहरण पाहिलेली आहेत जिथे सरकारची दादागिरी चालेली आहे. अगदी न्याय यंत्रणासुद्धा आपल्या दबावाखाली कशी येईल याबद्दल केंद्रीय कायदा मंत्री बोलत आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष बोलत आहेत. त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचेही अधिकार हवेत. मी ज्या प्रमाणे म्हटलं की देशातील लोकशाही संपलेली आहे," अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी नोंदवली.

भारतीय जनता पार्टीवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी, "मी अनेकदा आव्हान केलं आहे की निवडणुका घ्या. निवडणूक घ्यायची हिंमत नाही. ज्या पद्धतीने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यामुळे कदाचित येत्या महिन्या दोन महिन्यात निवडणुका जाहीर होऊ शकतील मुंबई महानगरपालिकेची. त्यांना काहीही करुन मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे. हाती कटोरा देऊन दिल्लीश्वराच्या दारात मुंबई उभी करायची आहे. ते त्यांचं स्वप्न धनुष्यबाण त्यांना देऊन साकार करण्याचं प्रयत्न करतील. कदाचित ते आमचं मशाल चिन्हंही घेतील. मात्र मशाल आता पेटलेली आहे. जेवढ्या यंत्रणा वापरुन आमच्याविरोधात कारवाई कराल त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही," असं म्हटलं.

नक्की वाचा >> Shivsena शिंदेंचीच हा निकाल निवडणूक आयोगाने कशाचा आधारावर दिला? ही पाहा आकडेवारी

"आजच्या दिवस त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे. पण ते धनुष्यबाण कागदावरचं आहे. जे खरं धनुष्यबाण आहे ते माझ्याकडे आहे आणि कायमचं माझ्याकडे राहणार आहे. ते मी तुम्हाला दाखवतो," असं उद्धव ठाकरे म्हणाले. "एकूण काय अनेकांना असं वाटलं असेल की शिवसेना आता संपली. शिवसेना आशी लेचीपेची नाही. तेव्हा सुद्धा आमच्याकडे नव्हती," असं उद्धव म्हणाले. त्यानंतर छोट्या आकाराचा धनुष्यबाण हातात घेऊन उद्धव यांनी, "हाच तो धनुष्यबाण ज्याचा उल्लेख मी वारंवार करतो. हा तुम्ही पाहू शकता. त्यावर कुंकू सुद्धा आपण पाहू शकता. हा शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातला, आमच्या पूजेत असलेला धनुष्यबाण आहे. याची पूजा खुद्द शिवसेनाप्रमुखांनी स्वत:च्या हाताने केलेली आहे. या धनुष्यबाणाचं तेज आणि ती जी काही शक्ती आहे ती यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. हा धनुष्यबाण आमच्या पूजेतला आहे आणि तो पूजेच राहणार," असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. 

नक्की वाचा >> Election Commission च्या निकालानंतर CM शिंदेंनी बदलला DP; बंडखरोनंतरचा Cover Photo पुन्हा झळकला

"रावणाकडे पण धनुष्यबाण आहे आणि रामाकडे पण आहे रामायणात रामाचा विजय झाला. 100 कौरव एकत्र आले तरी विजय पांडवांचा म्हणजे सत्याचाच झाला. सध्या जो अन्याय झालेला आहे तो अनेकांना मान्य नाही. अनेकजण पेटून उठले आहेत. अत्याचार होत आहे. लोकशाहीवर अत्याचार होत आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, अंधळ्यांचा ध्रुतराष्ट्र नाही. लोकशाहीचं असं वस्त्रहरण कदापी खपवून घेणार नाही. आम्ही या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.