Uddhav Thackeray On ECI: अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv sena) नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर निकाल दिला आहे. यामुळे ठाकरेंच्या हातून जवळपास शिवसेना निसटल्याचं चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. (Uddhav Thackeray announcement that the Thackeray group will go to the Supreme Court against ECI Maharastra Politics)
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी आगपाखड केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना चोर अशी उपाधी दिली आहे. निवडणूक आयोगानं शेण खाल्लं, असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे. ''आज शुक्रवार आहे. त्यामुळे आता निर्णय घेता येणार नाही. आम्ही नक्की या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ,'' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महानगरपालिका निवडणूक लावण्यासाठीच निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. चोराला राजमान्यता दिली गेली. धनुष्यबाणाची चोरी शिंदे गटाला पचणार नाही. येत्या दोन महिन्यात निवडणूका जाहीर होती, असं भाकित त्यांनी यावेळी व्यक्त केलंय.
देशात हुकूमशाही आहे हे पंतप्रधानांनी जाहीर करावं, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. आजचा निकाल अनपेक्षित होता. जनता त्याचा बदला घेईल, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.