मुंबई : मेट्रोच्या कारशेडला न्यायालयाने मान्यता दिली पण राज्य सरकारने केवळ इगो करता ऑर्डर काढून कांजूरला नेण्याचा प्रयत्न केल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आजचा उच्च न्यायालयाचा निर्णय हा राज्य सरकारला चपराक असल्याचे ते म्हणाले.
कांजूरमार्ग येथे कारशेड नेलं तर चार वर्ष उशीर होईल आणि ५००० कोटींचं नुकसान होईल हे आधी सांगितलं होतं पण सरकारने ऐकण्याची भूमिका ठेवली नाही. आता इगो बाजुला ठेवा आणि आरे मध्ये कारशेडचे काम सुरु करा. आम्ही कोणताही विरोध करणार नाही असेही फडणवीस म्हणाले.
या जमिनीमुळे सरकारचे ५ हजार ५०० कोटी रुपये वाचणार आहेत. मेट्रो लाईन ६, ४ आणि १४ साठी ही कारशेड महत्वाची असल्याचे ट्वीट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रतिक्रियेवर देखील भाष्य केले. आदित्य ठाकरे हे तरुण नेते आहेत. पण त्यांनी थोडा अहवालाचा अभ्यास करावा नंतरच विधान करावं असा टोला फडणवीसांनी लगावला.
कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने MMRDA ला दिले आहेत. त्या जागेची स्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आलेयत. कांजूरमधील मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. कांजूरमार्गच्या जागेचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाही राज्य सरकारनं तो कारशेडसाठी दिला होता. वारंवार खोटी कागदपत्र पुढे करत राज्य सरकारनं दिशाभूल केली असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.