मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा (Team India) क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) कारवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वी शॉने सेल्फी (Selfie) काढायला नकार दिल्याने आठ जणांच्या जमावाने त्याच्या कारवर हल्ला (Attack) केला. मुंबईतल्य ओशिवरा (Oshiwara) परिसरात ही घटना घडली आहे. पृथ्वी शॉ आपल्या मित्राच्या कारमध्ये बसला होता. त्यावेळी तिथे काही जणं आली, त्यांना पृथ्वी शॉबरोबर सेल्फी काढायचा होता. पण पृथ्वी शॉने नकार देताच त्यांनी रागाच्या भरात पृथ्वीच्या कारवर हल्ला केला. या प्रकरणी पृथ्वी शॉने ओशिवरा पोलीस (Oshiwara) स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे नेमकी घटना?
पृथ्वी शॉ आपल्या मित्राच्या कारमधून मुंबईतल्या ओशीवरा भागात आला होता. त्यावेळी रस्त्यावरच्या काही लोकांनी त्याला पाहिलं. त्यांना पृथ्वीबरोबर सेल्फी घ्यायचा होता. पण पृथ्वी शॉने त्यांना नकार दिला आणि त्याची कार पुढे निघून गेली. पण ती लोकं त्याच्या कारच्या मागे धावले. सेल्फीला नकार दिल्याने त्यांनी रागातून त्याच्या कारवर दगडफेक केली. सुदैवाने या हल्ल्यात पृथ्वीला कोणताही दुखापत झाली नाही.
आरोपींवर गुन्हा दाखल
हल्ला झाल्यानंतर पृथ्वी शॉचा मित्र कार घेऊन ओशिवरा पोलीस स्टेशनला दाखल झाला. त्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 384,143, 148,149, 427,504, आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे,
पृथ्वी शॉची ती पोस्ट चर्चेत
पृथ्वी शॉत क्रिकेटबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातही चर्चेत असतो. नुकतंच वेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर तो गर्लफ्रेंड निधी तापडिया (Nidhi Tapadia)सोबत लग्नबंधनात अडकल्याची बातमी समोर आली. स्वत: पृथ्वी शॉ आणि निधी तापडियाचा एक फोटो समोर आल्यानंतर ही चर्चा सुरु झाली. पृथ्वी आणि निधी तपाडियाचा एकमेकांना किस करतानाचा फोटो आहे.या फोटोच्या कॅप्शनला 'हॅप्पी वॅलेंटाईन माय वाईफ' असे कॅप्शनला लिहिण्यात आले आहेत. यासोबत ही स्टोरी निधीला टॅग करण्यात आली आहे. ही स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर झाल्यानंतर काही मिनिटांनी ती डिलीट देखील करण्यात आली होती.
पृथ्वी शॉची क्रिकेट कारकिर्द
पृथ्वी शॉ भारतासाठी आतापर्यंत 5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 1 T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. कसोटी सामन्यांच्या 9 डावात त्याने 42.37 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याने 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.50 च्या सरासरीने 189 धावा केल्या. पृथ्वीच्या नावावर एकमेक T20 सामना असून, यात त्याने फक्त एक चेंडू खेळला, ज्यामध्ये तो खाते उघडू शकला नाही.