काँग्रेसचा अजित पवारांना, तर राष्ट्रवादीचा पृथ्वीराज चव्हाणांना विरोध

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मतभेद...

Updated: Nov 29, 2019, 01:17 PM IST
काँग्रेसचा अजित पवारांना, तर राष्ट्रवादीचा पृथ्वीराज चव्हाणांना विरोध title=

मुंबई : राज्यात नुकताच महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी पार पडला. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2-2 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये सध्या उपमुख्यमंत्रिपदी कोणाला बसवावे याबाबत चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री बनवावं म्हणून आग्रही आहे. पण काँग्रेसचा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यास विरोध असल्याचं कळतं आहे. तर काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपद न देता काँग्रेसचा विधानसभेचं अध्य़क्षपद द्यावं अशी मागणी केली आहे. यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची काँग्रेसमध्ये चर्चा आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्षपद देण्यास राष्ट्रवादीचा विरोध असल्याचं देखील कळतं आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी महाविकासआघाडीमधलं हे दबावतंत्र समोर आलं आहे.

उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ नेते घेणार असून सध्या विश्वासदर्शक ठराव जिंकणं महत्त्वाचं असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. तर उपमुख्यमंत्रिपदावरून वाद नसल्याचा दावा भुजबळांनी केला आहे.

गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी पार पडताच पहिल्याच दिवशी आता हे मतभेद पुढे आले आहेत. काँग्रेस ही अध्यक्ष पदासाठी उपमुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे. पण जर विधानसभा अध्यक्ष मिळत नसेल तर उपमुख्यमंत्रीपद मिळावे, अशी काँग्रेसची मागणी आहे. राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री कोणाला करावे याबाबत देखील वेगवेगळी मतं आहेत. राष्ट्रवादीत अजित पवार की जयंत पाटील या दोन नावाची चर्चा सध्या आहे. पण छगन भुजबळ यांच्याकडे देखील उपमुख्यमंत्रिपदाचा अनुभव आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव उद्याच मांडण्याची शक्यता आहे. त्यासाठी उद्याच विधानसभेचं विशेष अधिवेशन भरवण्याची शक्यता आहे. सर्व आमदारांचा २७ तारखेला शपथविधी झाला आहे. त्यामुळे आता केवळ विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया बाकी आहे. यासाठी राज्यपालांना ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्याआधी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सर्व पक्षांचे आमदार गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच आहेत. त्यामुळे त्यांना लवकर मोकळं करता यावं यासाठी उद्याच ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा नव्या सरकाचा प्रयत्न आहे.