मुंबई : महाविकास आघाडीत सगळंच अलबेल आहे असे नाही, अशी चर्चा अनेकवेळा राजकीय जाणकरांकडून व्यक्त होत असते. त्याचे उदाहरण म्हणजे आज राज्यातील कॉंग्रेस नेते आणि प्रभारी एच के पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट होय.
निधीवाटप तसच किमान समान कार्यक्रमाच्या मुद्यावरून काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत नाराजी व्यक्त केलीय. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या भेटीवेळी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस नेत्यांनी निधीवाटपाबाबतचे आक्षेप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नोंदवले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे किमान समान कार्यक्रमावर काम व्हावं अशी मागणीही यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली.
या बैठकीत महामंडळाच्या नियुक्यांबद्दलही चर्चा करण्यात आली. तर लॉकडाऊन हे जनतेच्या हिताचं नाही, त्यामुळे लॉकडाऊन नको अशी भूमिकाही या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी मांडली. ही बैठक सकारात्मक झाल्याचंही काँग्रेस नेत्यांनी म्हंटलंय.
निधीवाटपाबाबत आपण लक्ष घालू तसच किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलंय. अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिलीय.