बळीराजाचं सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले! मु्ख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत

बैलगाडा शर्यंतीवर बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत

Updated: Dec 16, 2021, 05:23 PM IST
बळीराजाचं सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले! मु्ख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत title=

मुंबई : बैलगाडा शर्यंतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाची जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणजचे बळीराजाचं आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. 

आपली संस्कृती आणि परंपरा टीकवून ठेवणाऱ्या या शर्यंतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे.
बैलगाडी शर्यत ही पशूपालक आणि पशूधनावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बळीराजाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत पशूधनालाही दैवताचं स्थान आहे. यातून पशूधनाचे जतन, संवर्धनाचाही विचार केला गेला आहे. शर्यंतीमधून या सगळ्या बाबींना प्रोत्साहन मिळत असे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी दीर्घ असा आणि चिवटपणे लढा द्यावा लागला. त्यामागेही बळीराजाचे आपल्या पशूधनावरील प्रेमाचे बळच होतं. शर्यती, असोत किंवा नसोत, आपले पशूपालक या पशूधनाची पोटच्या लेकरांप्रमाणे काळजी घेतात, हे सर्वांनाच माहित होते. आता शर्यती सुरु होतील, त्यामधून आपल्या लोकपरंपरेचे आणि पशूधनाची वैभवही सगळ्यांना पाहता येईल अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार आणि पशूधनाचा कदापीही छळ होऊ नये. त्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जावे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यानी केलं आहे.