पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत

पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवली.

Updated: Jun 30, 2020, 05:14 PM IST
पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशावासियांना मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे 80 कोटी नागरिकांना 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ तसेच 1 किलो चना प्रतिमाह मोफत मिळणार आहे. या घोषणेनंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

'या योजनेत आता तांदूळ आणि गहू यासोबत चणा व डाळ देखील देण्यात यावी अशी आमची मागणी होती ती देखील मान्य झाली यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आज पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करत असताना याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, 'एक मोठी गोष्ट अशी आहे ज्यामुळे जग देखील हैराण आहे. ती म्हणजे, कोरोनासोबत लढताना ८० कोटीपेक्षा अधिक लोकांना राशन मोफत दिलं गेलं आहे. वर्षाऋतू दरम्यान आणि त्यानंतर कृषी क्षेत्रात जास्त काम होतं. इतर क्षेत्रात थोडी सुस्ती असते. जुलैपासून सणांचं वातावरण देखील सुरु होतं. त्यामुळे खर्च देखील वाढतो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि छटपुजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत केला जाईल. नोंव्हेंबर पर्यंत मोफत राशन दिलं जाईल. ८० कोटीहून अधिक लोकांना ५ किलो गहू किंवा तांदुळ मोफत दिलं जाईल. सोबतच एक किलो चणा देखील दिलं जाईल.'