यंदाच्या गणेशोत्सवात मिरवणुका नाहीत, मुख्यमंत्र्यांची मंडळांसोबत बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळांसोबत बैठक घेतली.

Updated: Jun 18, 2020, 04:15 PM IST
यंदाच्या गणेशोत्सवात मिरवणुका नाहीत, मुख्यमंत्र्यांची मंडळांसोबत बैठक title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळांसोबत बैठक घेतली. यंदाचा उत्सव हा धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही, त्यामुळे गर्दी करता येणार नाही तसंच मिरवणुकाही काढता येणार नाहीत. कोरोनामुळे सर्व प्रकारची दक्षता घेऊनच हा निर्णय साजरा करावा लागेल, असं मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले. 

'ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील, आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ, पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू,यासाठीचा कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू', असे ही मुख्यमंत्री म्हणाले.

गणेश मंडळांच्यामार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल, याचा आपण विचार करू आणि हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यातल्या गणेश मंडळांनी यंदाच्या वर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. तसंच शासन जो निर्णय घेईल तो मान्य करण्याची ग्वाहीही गणेश मंडळांनी दिली. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मंडळांना धन्यवाद दिले. 

मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार, आमदार, मुख्य सचिव अजोय मेहता, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, इतर वरिष्ठ अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.