बुद्धीबळाच्या पटावर नवा डाव, एकनाथ शिंदे मनोहर जोशी यांना घेऊन नवी चाल खेळणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी रणनीती, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची घेतली भेट

Updated: Jul 28, 2022, 08:59 PM IST
बुद्धीबळाच्या पटावर नवा डाव, एकनाथ शिंदे  मनोहर जोशी यांना घेऊन नवी चाल खेळणार? title=

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आता शिवसेनेवर (Shivsena) वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दुपारी शिवसेनेचे कार्यकारिणीचे सदस्य लिलाधर डाके (Liladhar Dake) यांची भेट घेतल्यानंतर आता संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेतली. गेल्याच आठवड्यात खासदार गजानन किर्तीकरांची (Gajanan Kirtikar) त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

बाळासाहेब ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी शिंदेंनी खास रणनीती आखलीय. त्याच रणनीतीनुसार शिंदेंनी गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली मनोहर जोशींची भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी दादर इथल्या निवासस्थानी जाऊन शिवसेनेची ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी मनोहर जोशी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मनोहर जोशी हे शिवसेनेचे जुने आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवायच्या आहेत. युती सरकारमध्ये 60 योजना मनोहर जोशी यांनी जाहीर केल्या होत्या. त्यांच्या सदिच्छा कामाला येतील. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. यातून राजकीय अर्थ काढू नये,  ते रोज पत्र देतात, रोज बोलतात त्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

मनोहर जोशी यांनी मला एक पुस्तक भेट दिलंय. त्यात त्यांनी त्यांच्या सीएम पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या योजनांची माहिती आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, मनोहर जोशी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान एक गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत होती, ती गोष्ट म्हणजे त्यांच्यासमोर ठेवलेला बुद्धीबळाचा पट. त्यामुळे या भेटीत मुख्यमंत्री शिंदे आणि मनोहर जोशी यांच्या भेटीमुळे राज्यात नव्या राजकीय डावाला सुरुवात होणार का याचीच चर्चा सुरु झाली आहे. 

ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी कशासाठी? 
कायद्यानुसार आमदार-खासदारांसोबत मूळ पक्षातही उभी फूट पडावी लागते. कोर्टात शिवसेनेची घटना आणि राष्ट्रीय कार्यकारिणी हे दोन घटक निर्णायक ठरू शकतात. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सध्या 15 सदस्य आहेत. त्यापैकी एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ, रामदास कदम या तिघांची उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी केलीय. सुधीर जोशी यांचं निधन झालंय.  तर सुभाष देसाई, मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे, गजानन कीर्तीकर, संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे हे सध्या उद्धव ठाकरेंसोबत आहेत.

त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेनेच्या वाढीसाठी झटलेल्या पहिल्या फळीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यामागं काय कारण आहे? हे वेगळं सांगायलाच नको. राष्ट्रीय कार्यकारिणीतही दोन तृतियांश सदस्य फुटल्याचं सिद्ध केल्यास शिंदेंना शिवसेनेवर ताबा मिळवता येईल. त्यासाठीच शिंदे कंबर कसून कामाला लागलेत.