Majhi Ladaki Bahin Yojana : आगामी (Vidhansabha Election 2024) विधानसभा निवडणुकीला केंद्रस्थानी ठेवत सत्ताधारी महायुतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला वर्गाला सबल करत त्यांना आधार देण्याच्या हेतूनं राज्य शासनाच्या वतीनं ही योजना सुरु करण्यात आली. पण, इथंही अनेकांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आणि आता शिंदे सरकारला खडबडून जाग आली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी आता योजनेसाठी येणाऱ्या अर्जांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. इतकंच नव्हे, तर बोगस अर्ज आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचाही इशारा शासनाकडून देण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने पैसे लाटण्याच्या प्रकारानंतर महिला आणि बालविकास विभाग आता खडबडून जागे झाले आहे. ज्यामुळं इथून पुढे योजनेसाठी आलेल्या अर्जांची सखोल छाननी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. थोडक्यात एकाच नावावर अनेक अर्ज आणि चुकीची माहिती देण्याचा प्रयत्नही करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे हे नक्की.
लाडकी बहीण योजनेअंतर्ग एकिकडे सरकारकडून महिलांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न असतानचा नवी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला. जिथं एका व्यक्तीनं पत्नीच्या नावे या योजनेचे 30 अर्ज भरले. मात्र एका आकड्यामुळं हा सर्प प्रकार उघडकीस आला. एकच बँक अकाऊंट 30 वेगवेगळ्या आधार कार्डशी जोडल्याचं या प्रकरणातून हे समोर झालं. खारघरमधील महिला पूजा महामुनी यांच्या आधार कार्डचा वापर करत ही फसवणूक झाल्याचं समोर आलं. ज्यानंतर सदर प्रकरणाची पनवेल तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती.