दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने परस्पर घेतला. महाराष्ट्र सरकारला याची कोणतीही कल्पना नव्हती, असा खुलासा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला. मुंबईतील नियोजत IFSC केंद्र गुजरातला हलवण्या आल्यामुळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर सुभाष देसाई यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रावरील मुंबईचा दावा हा नैसर्गिक आहे. कारण जगातील इतर देश मुंबईलाच भारताची आर्थिक राजधान म्हणून ओळखतात. देशातील अनेक वित्तीय संस्था आणि बँकांची मुख्यालये ही मुंबईतच आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासाठी (IFSC) मुंबईच योग्य असल्याचे सुभाष देसाई यांनी ठासून सांगितले.
केंद्राच्या निर्णयानंतर समजा इतर कुठे ओढूनताणून IFSC ची स्थापना झालीच तर त्याला फारसे यश मिळणार नाही. यश मिळाले तरी त्यासाठी खूप वेळ जावा लागेल. जगातील संस्थांनाही हे सोयीस्कर पडणार नाही. कारण, मुंबईसारख्या आर्थिक सोयी देशात इतरत्र कुठेच नाहीत. याउलट हे केंद्र मुंबईत असेल तर त्याला झटपट यश मिळेल. कारण, या केंद्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक रचना मुंबईत पहिल्यापासून तयार आहेत, असे देसाई यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे मुंबईत होणार हे सुरुवीपासूनच ठरले होते. त्यासाठी बीकेसीतील जागाही निश्चित करण्यात आली होती. मात्र, केंद्राने परस्पर हे केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला. परंतु, आम्ही शांत बसणार नाही. हे केंद्र मुंबईतच राहावे, यासाठी आम्ही प्रयत्न सुरु ठेवू. आम्ही केंद्र सरकारकडे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणार असल्याची माहिती यावेळी सुभाष देसाई यांनी दिली. तसेच कितीही प्रयत्न झाले तरी मुंबईचे महत्त्व कमी करणे शक्य नाही. मात्र, यानिमित्ताने केंद्र सरकारच्या मनातील हेतूचे विश्लेषण होण्याची गरज सुभाष देसाई यांनी बोलून दाखविली.