अनोखी भाऊबीज : भावाने बहिणीला दिले मूत्रपिंड

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादी मोठी असल्याने मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 23, 2017, 12:39 PM IST
अनोखी भाऊबीज : भावाने बहिणीला दिले मूत्रपिंड title=

मुंबई : दिवाळीमध्ये भाऊबीज ठिकठिकाणी उत्साहात साजरी झाली. याच्या अनेक कहाण्या आपण ऐकल्या पण ही कहाणी याहून जरा वेगळी आहे. या भावा-बहिणींनी आपल्या निर्मळ नात्याचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

३६ वर्षांचा राहुल आणि ३० वर्षांची रमा हे दोघे भाऊ बहिण. यावर्षीची त्यांची भाऊबीज त्यांच्यासोबतच जगाच्याही कायमची लक्षात राहणारी आहे. कारण राहुलने आपल्या बहिणीला मूत्रपिंडदान करुन नव्या आयुष्याचे गिफ्ट देऊ केले आहे.

रमा ही काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होती.  लवकरात लवकर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हाच यावर उपचार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादी मोठी असल्याने मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. पण ऐन भाऊबीजेच्या पवित्र सणात या भावासमोर हा प्रश्न किरकोळ होता.  

रमाच्या प्रकृतीत सुधारणा

राहुलनेच पुढाकार घेत रमाला मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. परळ येथील खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया शुक्रवारी पार पडली. यामूळे रमाला नव संजीवनी मिळाली असून आता तिच्या प्रकृतीत सुधारणा होत चालली आहे. राहुलने या सर्वावर समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.