पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC) पार्श्वभूमीवर भाजपने (bjp) मैदानात उतरण्याचे ठरवलं आहे. यासाठी भाजपने रणनीती देखील आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी शनिवारी मुंबईतील आमदार खासदारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devednra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यामध्ये खास बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आमदार खासदारांना मार्गदर्शन केले. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवली गेली असल्याची चर्चाही केली जात आहे. या बैठकीला प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, भारती लव्हेकर, आशिष शेलार उपस्थित होते. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
या बैठकीत मुंबई महापालिकेच्या 151 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक बांधणी आणि कामाची गती याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आले. 151 नगरसेवक निवडूण आणण्यासाठी काही रणनीतीवर देखील चर्चा झाली, अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली होती. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"कुठलाही राजकीय पक्ष म्हटले की ते निवडणुकीच्या तयारीला लागतात. भाजप केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्ष आहे. तसेही अनेक वर्षांपासून मुंबई काबीज करण्याची त्यांची इच्छा आहे. ज्यावेळी शिवसेना निवडून आली त्यानंतर त्यांनी महानगरपालिका ताब्यात घेतली. मुंबई महानगरपालिकेचे बजेट हे अनेक राज्यांपेक्षा जास्त आहे, भाजप शिवसेना मागील वेळी एकत्र होते. त्यावेळी महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने सर्वस्व पणाला लावले होते, पण त्यावेळी जनतेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कौल दिला होता. आताच वातावरण बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूती आहे. येणाऱ्या सर्वेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा दाखवत आहेत. केंद्रातले भाजपचे मंत्री मुंबईत येऊन दौरे करत आहे. आपला पक्ष वाढवावा स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असावं हे प्रत्येकाला वाटत, त्यामुळे हे चालले आहे. राष्ट्रवादी पक्षाची भूमिका एवढीच आहे की राष्ट्रवादी पक्ष मुंबई शहरात ताकदवर नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना विनंती केली की एकत्रितपणे आपण निवडणुकीला समोरे जाऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक लढू," असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यासाठी भाजपने रणनीती आखली असून मुंबईत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र काम करण्याचे आदेश दिले आहेत. मोदी@9 कार्यक्रम स्थानिक लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप घर घर अभियान राबवणार आहे. पालिका निवडणुकीआधी सर्वसामान्य जनतेसोबतचा संपर्क वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.