'कोरोना'च्या सामन्यासाठी मुंबई महापालिका सज्ज, इकडे होणार तपासणी

कोरोनाचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने तयारी सुरु केली आहे. 

Updated: Mar 4, 2020, 11:21 PM IST
'कोरोना'च्या सामन्यासाठी मुंबई महापालिका सज्ज, इकडे होणार तपासणी title=

मुंबई : कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली असताना मुंबई महानगरपालिका सुद्धा या आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. याचाच भाग म्हणून रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी, मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.

या आधी संपुर्ण राज्यात फक्त पुण्यातच ही प्रयोगशाळा होती. या प्रयोगशाळेत एकावेळी ९० तपासण्या करता येणार आहेत. याशिवाय मुंबईतल्या पालिका रुग्णालयांतल्या खाटांची संख्याही वाढवण्यात आली असल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं आहे.

कोरोनाचा धोका सर्वाधिक असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची मुंबई विमानतळावर थर्मल स्कॅनरने चाचणी तपासणी केली जात आहे. तसंच विमानतळावर वैद्यकीय पथकंही तैनात करण्यात आली आहेत. तर संशयित रुग्णांना तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवलं जातं. तसंच आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्स तैनात असल्याचं सांगण्यात आलंय.

भारतात आतापर्यंत २५ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. त्यापैकी २३ जणांच्या तपासाचा अहवाल येणं बाकी आहे. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने चीन, इटली, ईराण, साऊथ कोरिआ, आणि जपानहून येणाऱ्या प्रवशांचा व्हिजा रद्द केलाय. ३ मार्चनंतर या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना भारताचा व्हिजा नाकारण्यात आलाय. कोरोना व्हायरसमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. 

कोरोना व्हायरसबाबत तक्रार आणि सूचनांसाठी एक कॉल सेंटर सुरु करण्यात आलं आहे. २४ तास सुरु असणाऱ्या या क्रमांकावर संपर्क 01123978046 साधता येऊ शकतो.