'तुम्हाला न विचारताच राष्ट्रवादीचे मंत्री निर्णय घेतात का?' भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

भाजपने शिवसेनेला डिवचलं

Updated: Mar 4, 2020, 10:59 PM IST
'तुम्हाला न विचारताच राष्ट्रवादीचे मंत्री निर्णय घेतात का?' भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा title=

मुंबई : मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुस्लिम समाजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण देणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत केली होती. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असं म्हणत भाजपने याला विरोध केला होता.

दुसरीकडे मुस्लिम आरक्षणाचा प्रस्तावच आपल्याकडे आला नाही. जो मुद्दा आमच्यासमोर आलेला नाही त्यावरुन आदळआपट करण्याची गरज नाही. ज्यावेळी मुद्दा समोर येईल, त्यावेळी सर्व बाजू तपासून घेतल्या जातील, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

उद्धव ठाकरेंच्या या स्पष्टीकरणावरुन भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री मुख्यमंत्र्यांना न विचारता निर्णय घोषित करतात का? नक्की हे सरकार चालवतंय कोण? असे प्रश्न करणारं ट्विट भाजपने केलं आहे.

भाजपने केलेल्या ट्विटमध्ये शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे दोन फोटो लावण्यात आलेले आहेत. यातल्या पहिल्या फोटोमध्ये 'मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण, राज्य सरकारचा निर्णय', अशी हेडलाईन देण्यात आली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये 'मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव नाही, आदळआपट कशाला?' असा उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाची हेडलाईन देण्यात आली आहे.