मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Worker Protest) हल्ला केल्यानंतर राज्यातील राजकारण कमालीचं तापलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सिल्व्हर ओकवर (Siver Oak) या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे. कालचा जो प्रसंग होता, त्या प्रसंगामागे जे कारस्थान आहे, ते आंदोलन नव्हतं तो हल्ला होता. आंदोलनं आम्हीही करतो.
त्या हल्ल्याचं समर्थन या महाराष्ट्रतील विरोधी पक्षातील लोकं करतायत हा दळभद्री पणाचा कळस आहे, अशा प्रकारे तुम्हाला सरकारला अडचणीत आणता येणार नाही. तुमची बेअब्रु होतेय. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर. त्यांचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात संसदीय लोकशाही पद्धतीत, विकासात, शेती क्षेत्रात जे प्रचंज योगदान आहे. अशा नेत्यावर महाराष्ट्रातच आपल्या लोकांच्या घरावर तुम्ही हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आतासुद्धा भाजपाचा निवनिर्माण केलेला नेता आहे सदावर्ते त्याला संपूर्ण पाठबळ भाजपचं आहे. तो कुठे राहतो, कुणाच्या घरात राहतो, त्याला आर्थिक पाठबळ कुणाचं आहे. त्याला फक्त महाविकास आघाडी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठीच अर्थपुरवठा केला जातो. कालचा हल्ला हा त्याचाच एक भाग होता. आम्ही जो तपास करतो त्यातून हे सिद्ध झालं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
आता जे आंदोलक आझाद मैदानातून हलवून रेल्वे स्थानकावर बसले आहेत. त्यांच्याकडे एकाचवेळी प्लॅटफॉर्म तिकिट कशी असू शकतात? कोणती यंत्रणा हे काम करतेय? कोणता राजकीय त्यांना पोसतोय? असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.
कामगारांच्या आंदोलनाविषयी आम्हाला सहानभूती आहे. शिवसेनेने कायम कामगारांची पाठराखण केलेली आहे. कामगारांच्या श्रमातून शिवसेना निर्माण झालेली आहे. पण कामगारांचा एक गट ज्या पद्धतीने भडकावून महाराष्ट्राविरुद्ध, मुख्यमंत्र्यांविरुद्ध, शरद पवारांविरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.