अजित पवारांना धक्का; राजभवनावर गेलेले काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीकडे

राज्यात एका रात्रीत नाट्यमय घडामोडी होऊन सकाळी ८ वाजता राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या सहकार्याने भाजपचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  

Updated: Nov 23, 2019, 05:18 PM IST
अजित पवारांना धक्का; राजभवनावर गेलेले काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीकडे title=

मुंबई : राज्यात युती तुटल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी जोरादार झाल्यात. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची सत्तास्थापन करण्यासाठी महाविकासआघाडी झाली. काल अंतिम चर्चा झाल्यानंतर आज पुन्हा चर्चा होऊन सत्तास्थापन करण्याचा दावा करण्यात येणार होता. मात्र, एका रात्रीत नाट्यमय घडामोडी होऊन सकाळी ८ वाजता राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या सहकार्याने भाजपचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी राजभवनावर अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदार होते. मात्र, यातील काही आमदारांनी अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी आणि शरद पवारांसोबत राहण्याचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आणि महाविकासआघाडीला धक्का देणाऱ्या अजित पवार यांना हा जोरदार धक्का आहे.

१३ पैकी सात आमदार माघारी परतले असून सहा आमदार पक्षाच्या संपर्कात नाहीत. ते अजित पवार यांच्यासोबत राहीले आहेत. काल रात्री १२ वाजता आम्हाला फोन आला. सकाळी सात वाजता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर या. महत्त्वाचं बोलायचं आहे, असं सांगण्यात आलं. नेत्यांचा फोन असल्यामुळं आम्ही गेलो. १०-१५ मिनिटांत तिथं आणखी काही आमदार आले. अजितदादा तिथं नव्हते. थोड्या वेळानं चर्चा करायला जायचं आहे असं सांगून आम्हाला राजभवनावर नेण्यात आलं. छोट्याशा हॉलमध्ये बसवण्यात आलं. तोपर्यंत आम्हाला काहीही माहीत नव्हतं. प्रवासात आम्ही आपसांत चर्चा केली. पण कुणालाही कशाचाही थांगपत्ता नव्हता. आमची चर्चा सुरू असतानाच तिथं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व भाजपचे काही नेते आले. त्यानंतर शपथविधी झाला. आम्ही सगळे अतिशय अस्वस्थ होतो. तिथून थेट निघून साहेबांकडं आलो आणि त्यांच्याशी बोललो. आम्ही पक्षासोबतच आहोत.

तसेच अजित पवार यांच्या बोलावण्यावरून राजभवनवर गेलेले काही आमदार काही तासांतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे परत आले आहेत. 'कुठलीही कल्पना न देता आम्हाला राजभवनवर बोलावण्यात आले होते. मात्र, आम्ही पक्षाच्या सोबत आहोत, असे या आमदारांनी स्पष्ट केले आहे. राजभवनावर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा राष्ट्रवादीचे काही आमदार उपस्थित होते. त्यापैकी काही आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले. या सगळ्या नाट्याची माहिती बुलढाण्याचे आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील विक्रमगडचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा हेदेखील शपथविधीवेळी अजित पवार यांच्यासमवेत राजभवन इथं होते. रात्री ते अजित पवारांच्या संपर्कात होते. मात्र आता ते पुन्हा शरद पवारांकडे परत आले आहेत. 

तर आमदार दौलत दरोडा यांच्याशी त्यांच्या मुलाचा संपर्क होत नाहीय. त्यांचा फोन बंद असल्याचं त्यांचा मुलगा करण दरोडा यांनी सांगतिलं. दौलत दरोडा यांना सकाळी राजभवनावर बोलावण्यात आलं होतं अशी माहिती त्यांच्या मुलानं दिली.

परत आलेले आमदार 

सुनील शेळके - मावळ
संदीप क्षीरसागर - बीड
राजेंद्र शिंगणे - सिंदखेडराजा 
सुनील भुसारा - विक्रमगड
माणिकराव कोकाटे - सिन्नर 
दिलीप बनकर - निफाड
सुनील टिंगरे  - वडगाव शेरी 

अजितदादांसोबत असलेले आमदार 

धनंजय मुंडे - परळी
नरहरी झिरवळ - दिंडोरी
बाबासाहेब पाटील - अहमदपूर
अनिल पाटील - अंमळनेर 
दौलत दरोडा - शहापूर 
प्रकाश सोळंकी, माजलगाव