मुंबई : मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विश्वासदर्शक ठराव होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री कमलनाथ सरकार पडले असे म्हणता येणार नाही. काँग्रेसअंतर्गत वादामुळे मध्य प्रदेशात हे घडत आहे. मात्र, भाजपने त्याचे श्रेय घेवू नये, असे सांगत ज्योतिरादित्य सिंधिया यांना सांभाळायला हवे होते, तिथे काँग्रेस पक्षात मिस हँडलिंग झाले आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेनेही महाविकासआघाडी भक्कम आहे. भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचे स्वप्न पाहू नये, असा टोला लगावला. मध्यप्रदेशनंतर आता महाराष्ट्रात भाजप ऑपरेशन कमळ राबवणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊतांनी ट्विट करून उत्तर दिले आहे.
गोवा, कर्नाटकात भाजपने कमळ ऑपरेशन राबवत आपली सत्ता आणली आहे. त्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशमध्ये आपला मोर्चा वळवला आहे. त्यापुढील टार्गेट हे महाराष्ट्र आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे. विश्वासदर्शक ठराव होत नाही तोपर्यंत कमलनाथ सरकार पडले असं म्हणता येणार नाही. काँग्रेसअंतर्गत वादामुळे मध्य प्रदेशात हे घडत आहे. भाजपने त्याचे श्रेय घेवू नये. ज्योतिरादित्य सिंधिया यांना सांभाळायला हवं होते. तिथं काँग्रेस पक्षात मिस हँडलिंग झाले आहे.
महाराष्ट्राची 'पाॅवर' वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे.त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला.मधयप्रदेशचा वायरस महाराष्ट्रत घुसणार नाही. चिंता नसावी.
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) March 11, 2020
महाराष्ट्रात याचा कोणताही परिणाम होणार नाही, कुणाला गुदगुल्या होत असतील तर त्या अस्वलाच्या गुदगुल्या आहेत. अस्वलाची नखे लागतात आणि स्वतःच रक्तबंबाळ होतो. ऑपरेशन कमळ वगैरे काही नसते. १०० दिवसांपूर्वी ऑपरेशन कमळ करून ८० तासांचे सरकार बनवले होते. परंतु ते कसे फेल गेले आणि ऑपरेशन करणारे कसे दगावले याचे भान स्वप्न पाहणाऱ्यांनी ठेवावे. भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात स्वप्न पाहू नये. अग्रलेख वाचत राहा, तो वाचण्यासाठी असतो चर्चेसाठी नसतो, असा जोरदार टोला राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्रात ऑपरेशन करायला भाजपच्या दिल्लीतील आणि राज्यातील नेत्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील. मध्यप्रदेशचा आनंद भाजपचे नेते घेतायत, राज्यातील भाजपच्या नेत्यांनी मध्य प्रदेशचा आनंद घ्यावा. महाराष्ट्रात असा आनंद त्यांना घेता येणार नाही, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. तर महाविकास आघाडी भक्कम आहे. भाजपचे नेते स्वप्न पाहतायत ते पूर्ण होणार नाही अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी केलीय.
दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्ष सोडल्यामुळे झटका बसला आहे. मात्र पक्ष सावरणारच नाही, असे होणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिलीय. मध्य प्रदेश सरकार वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.