आमचं वैर नाही! नारायण राणे उद्धव ठाकरेंना माशाचं जेवण खाऊ घालणार

मी सिनिअर आहे, निमंत्रण पत्रिकेवर बारीक अक्षरात नाव छापल्याने नारायण राणे नाराज 

Updated: Oct 8, 2021, 05:24 PM IST
आमचं वैर नाही! नारायण राणे उद्धव ठाकरेंना माशाचं जेवण खाऊ घालणार  title=

मुंबई : सिंधुदुर्ग (Sindhudurga) जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं (Chipi Airport) उद्या उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayn Rane) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्याआधी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत माझं आणि त्यांचं वैर नाही, माननीय उद्धव ठाकरे येऊ दे त्यांचं स्वागत आहे, त्यांना माशांचं जेऊन खाऊ घालून पाहुणचार करु असं म्हटलं आहे. राणे विरुद्ध शिवसेना वाद झाल्यानंतर हे दोघंही पहिल्यांदाच एकाच व्यासपिठावर येणार असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या कार्यक्रमाकडे असणार आहे.

नारायण राणे यांनी व्यक्त केली नाराजी

चिपी विमानतळाच्या उद्घाटन पत्रिकेवरुन नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विमानतळ उद्घाटनाची आमंत्रण पत्रिका पाहिली का? माणसाने किती संकुचित असावं बघा, माझं नाव लहान अक्षरात छापलं आहे. उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नंतर माझं नाव छापण्यात आलं आहे, तेही लहान अक्षरात छापण्यात आलं आहे. राजकारणात आणि प्रोटोकॉलप्रमाणे मी या दोघांना सिनिअर आहे, पण ठिक आहे, मुख्यमंत्र्यांचा मान मोठा असतो असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. चिपी विमानतळाचे सर्व श्रेय भाजपचे आणि आमचं आहे, पाहुणे म्हणून बोलावलं आहे, पाहुणे म्हणू या असंही नारायण राणे यांनी ठणकावलं आहे.

आता जी चिल्लर फिरतेय ना...

1990 साली आमदार झालो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. पण पहिल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम आपण केलं पाहिजे या दृष्टीने आपण कार्यरत होतो. हा जन्मजिल्हा आहे म्हणून मला विशिष्ट आनंद आहे. जिल्ह्याचा विकास कसा करावा, याची माहिती मी संपूर्ण घेतली. पक्के रस्ते न्हवते, पाण्याचा प्रश्न होता, आरोग्य आणि शिक्षणाची स्थितीही त्यावेळी बिकट होती. रोजगाराचा मोठा प्रश्न होता. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा करुन घेण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. आता जी चिल्लर फिरतेय ना बाजारात आम्हीच केलं, आम्हीच केलं म्हणत ती त्यावेळी नव्हती असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

विनायक राऊत यांच्यावर टीका

मी राज्यात, दिल्ली पाठपुरावा करून सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करून घेतला,  त्यासाठी काय करायला हवं याबाबत अनेकदा चर्चा केली
पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात करायला हव्या होत्या, योगायोगाने मी 1999 साली मुख्यमंत्री झालो, तेव्हा एकाच वेळेला 110 कोटी देऊन 28 पूल आणि रस्ते एकाच वेळी केले. पाण्याचा प्रश्न योजना करून सोडवला, तेव्हा हे विनायक राऊत कुठे होते असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.

विमानतळासाठी प्रफुल पटेल यांना भेटलो

मी त्यावेळी ठरवलं जिल्ह्यात विमानतळ व्हायला हवं, तेव्हा विमानतळासाठी जागा निश्चित केली. 2000 किलोमीटर डिस्ने लॅण्ड येणार होती, सावंतवाडीच्या डोंगरात रोप वे येणार होता, 28 ठिकाणं पर्यटकांना पाहण्यासाठी होती, हे सगळं झाल्यानंतर परदेशी पर्यटक किमान 7 दिवस रहावा आणि त्याने तेव्हा 5 लाख तरी खर्च करावे आणि ते स्थानिक लोकांच्या घरात जावे हा उद्देश होता, म्हणून आम्ही विमानतळ जागा निश्चित केली, तेव्हा प्रफुल पटेल विमान वाहतूक मंत्री होते, मी त्यांना दिल्लीत जाऊन भेटलो, तेव्हा मी महसूल मंत्री होतो. त्यांनी मंजूर केलं, आता यात शिवसेनेचा कोण दिसतंय का? असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

शिवसेनेचा विकासात सहभाग नाही

कोकणातील रस्ता मी केला, यांनी एकच काम केलं गाड्या अडवल्या, हायवेचे काम करायचं असेल तर आम्हाला कार द्या असं शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं
त्यांना कार दिल्यावर काम सुरू झालं, त्या कारचे फोटो माझ्याकडे आहेत असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी यावेळी केला. शिवसेनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात एक टक्क्याचा सहभाग नसल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.

विकासाच्या आड येणाऱ्यांचा भांडाफोड करणार

नारायण राणे यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आड येणाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच या सर्व गोष्टींचा गौप्यस्फोट करणार असून स्टेजवर हात दाखवून सांगणार याने हे केलं, असा इशाराही राणे यांनी दिला आहे. कोकणात हप्तेबाजी सुरु असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे. 

त्यामुळे चिपी विमानतळाच्या निमित्ताने उद्या कोकणात नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा वादाचा नवा अंक सुरु होण्याची शक्यता आहे.