'बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी पण...' प्रियंका गांधींचा मोदींवर पलटवार

Maharashtra Assembly Election : काँग्रेसच्या तोंडी बाळासाहेब ठाकरेंचं नाव नसतं असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं गुणगाण काँग्रेसच्या नेत्यांनी करून दाखवावं असं चॅलेंज मोदींनी दिलं होतं. त्यावर आता प्रियंका गांधींनी प्रत्युत्तर देत थेट मोदींनाच प्रतिसवाल केलाय. 

नेहा चौधरी | Updated: Nov 16, 2024, 08:24 PM IST
'बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी पण...' प्रियंका गांधींचा मोदींवर पलटवार title=

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्रात प्रचारसभा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामार्फत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना चॅलेंज दिले होते. राहुल गांधींनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा भाषणात उल्लेख करावा त्यांचं गुणगाण करावं असं जाहीर आव्हान पंतप्रधान मोदींनी केलं होतं. निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेते सातत्यानं या गोष्टीचा उल्लेख करत होते. मोदींच्या आणि भाजपच्या आव्हानाला प्रियंका गांधींनी प्रत्युत्तर दिलंय. मी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते, असं प्रियंका गांधींनी जाहीर केलं. आमच्या राजकीय मतभेद होते मात्र आम्ही सर्व जण शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, असंही प्रियंका गांधींनी म्हटलंय.

'प्रचारासाठी येथे आलेल्या मोदींनी माझा भाऊ राहुल याला आव्हान दिले होते. आज राहुल यांची बहीण म्हणून मी मोदींना उत्तर देते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी होती. मात्र ठाकरे आणि काँग्रेस दोघांनीही शिवरायांचा सन्मान केला. शिवरायांचा आपमान येथे सहन केला जाणार नाही. माझा भाऊ राहुल याच्यावर नेहमी खोटे आरोप करणाऱ्या मोदींना माझे आव्हान आहे त्यांनी जाहीरपणे जातीनिहाय जनगणना करणार याची घोषणा करावी. 

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी प्रियंका यांची शनिवारी सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, महाविकास आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मोदींच्या या चॅलेंजवर स्वत: उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधी शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करून गेले याची आठवण उद्धव ठाकरेंनी मोदींना केलीय. इतकंच नाही तर यावरून ठाकरेंनी उलट भाजपलाच चिमटा काढलाय.

काँग्रेसकडून बाळासाहेबांचं गुणगाण केलं जात नाही. बाळासाहेबांचा काँग्रेसकडून सन्मान केला जात नाही असा आरोप केला जात होता. भाजपच्या या आरोपांना प्रियंका आणि राहुल गांधींनी आपल्या कृतीतून उत्तर देत महायुतीला निरुत्तर केलंय.