मुंबई: शिवसेनेकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. नवीन सरकार आल्यानंतर मला शिवसैनिकांकडून धमक्या येण्याचे प्रमाण वाढले आहे. दूरध्वनी, फेसबुक आणि ट्विटर या माध्यमातून वारंवार मला धमक्या दिल्या जात आहेत. दोन वर्षांपूर्वीच्या हल्ल्यात वाचलास, आता वाचणार नाही, असे सांगून मला धमकावले जात आहे. त्यामुळे सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्रही पाठवले आहे. काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. मी आतापर्यंत अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत. त्यामुळेच मला शिवसेनेकडून धमक्या येत आहेत. शिवसेनेची ही गुंडगिरी जगासमोर यावी यासाठी राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र पाठवल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
मोठी बातमी: विक्रोळीत शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखावर गोळीबार
२०१४ मध्ये युती तुटल्यानंतर शिवसेनेवर आक्रमकपणे तुटून पडणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये किरीट सोमय्या आघाडीवर होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर किरीट सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर दोषारोप केले होते. तेव्हापासून शिवसैनिक आणि किरीट सोमय्या यांचा ३६ चा आकडा झाला होता. त्यामुळेच लोकसभेत भाजपसोबत युती करण्यासाठी शिवसेनेने किरीट सोमय्या यांनी कोणत्याही परिस्थितीत खासदारकीचे तिकीट न देण्याची मागणी केली होती. भाजपनेही ही मागणी मान्य करत किरीट सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे किरीट सोमय्या यांचे पुन्हा लोकसभेत जाण्याचे स्वप्न भंगले होते.