मुंबई : पेगॅसिस हेरगिरीच्या मुद्दयावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुंबईत भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पहायला मिळत आहे. पेगॅसिस प्रकरणी मुंबई काँग्रेसने दादर रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन सुरु केलं. त्याचवेळी भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते त्या परिसरात पोहचले.
भापपने जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यामुळे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
पेगॅसिस हेरगिरीच्या मुद्दयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्यने जमत काँग्रेस कार्यकर्त्यांना विरोध केला. दरम्यान, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आणि काँग्रेस नेते झिशान सिद्दीकी तसंच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
झिशान सिद्दीकी यांचा आरोप
राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी सुरु असून फोन टॅपिंग केलं जात असल्याचा आरोप काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. आपल्याच देशात नागरीक सुरक्षित नसल्याचं सांगत काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात येत होतं.
पोलिसांना धक्काबुक्की
दरम्यान, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता काही जणांकडून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली.