BJP Agitation : अजित पवारांविरोधातील आंदोलनात भाजपचा राडा, जोरदार घोषणाबाजी

BJP Agitation In Mumbai : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात भाजपने (BJP Agitation) मुंबईत निषेध आंदोलन केले. 

Updated: Jan 3, 2023, 11:58 AM IST
BJP Agitation : अजित पवारांविरोधातील आंदोलनात भाजपचा राडा, जोरदार घोषणाबाजी title=

BJP Agitation In Mumbai : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात भाजपनं (BJP Agitation) मुंबईत निषेध आंदोलन केले. (Maharashtra Political News) यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर जोरदार राडा पाहायला मिळाला. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, या त्यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाले आहे. अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. जोपर्यतं माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध भाजप मध्य दक्षिण जिल्ह्याच्यावतीने दादर स्टेशन याठिकाणी सुरु करण्यात आले. अजित पवार यांचे पोस्टर हातात घेऊन निषेध केला जात होता. यावेळी अजित पवार यांच्या फोटोवर गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आणि जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली. 

हिंगोली, पुणे, नाशिकमध्ये आंदोलन

याआधी हिंगोली येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल  अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांच्या छायाचित्राला जोडेमारो आंदोलन केले. यावेळी अजित पवार यांच्यावर कारवाई करा, मागणी करण्यात आली. पुणे-नाशिकमध्येही अजित पवारांविरोधात भाजपनं आंदोलन केले. छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार निदर्शने केली. पुण्यात खंडोजीबाबा चौक छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर आंदोलन केले. यावेळी प्रतिकात्मक अजित पवार यांच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आले.  तर नाशिकमध्येही भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता.

अजित पवार यांनी कोणता ऐतिहासिक संदर्भ जोडला ?

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर होते, आहेत आणि पुढेही राहतील, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी अजित पवार यांना अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचाही निषेध त्यांनी केला आहे. अजित पवार यांनी अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. अजित पवारांचे विधान हे अर्धसत्य आहे. तेव्हा त्यांनी ते विधान मागे घ्यावे, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे. त्याचवेळी त्यांना आव्हानही दिले आहे. अजित पवार यांनी कोणता ऐतिहासिक संदर्भ जोडला तेही सांगावे, असे संभाजीराजे म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले होते?

आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काहीजण त्यांना धर्मवीर म्हणतात. मात्र, राजे हे धर्मवीर नव्हते, असे अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान म्हटले होते. त्यानंतर आता अजितदादांच्या या वक्तव्यावरुन चांगलाच वाद पेटला आहे. या वादात आता भाजपने उडी घेतली आहे. अजित पवारांविरोधात राज्यभर निदर्षने देखील केली जात आहेत.