मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिल्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार पार पडला. नव्या मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामधील 15 मंत्र्यांना कॅबिनेट तर 28 मंत्र्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 ची लोकसभा निवडणूक पाहता हा मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्रातून चार नेत्यांना संधी मिळाली. यात नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. तर कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे.
महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात मिळालेल्या नेत्यांवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला लगावला आहे. भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे. त्यामुळे त्यांना चेहरे मिळाले. मंत्रिमंडळाचा चेहरा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आहे. आपण नवीन मंत्रांना आम्ही शुभेच्छा देतो, असं राऊत म्हणाले.
नारायण राणे (Narayan Rane) हे शिवसेना, काँग्रेस करत भाजपात गेले आहेत, कपिल पाटील (Kapil Patil) हे राष्ट्रवादीचं प्रोडक्ट आहे. भारती पवार (Bharti Pawar) या पूर्णपणे राष्ट्रवादीचं प्रोडक्शन आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना राष्ट्रवादीचाच आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात संधी मिळालेले चारपैकी तीन नेते हे वेगवेगळ्या पक्षातून भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना संधी देण्यात आल्याची टीका विरोधी पक्ष नेते करताना दिसतायत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान राज्यसभा सदस्य नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्यात आलं आहे. नारायण राणे गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. शिवसेनेतून राजकीय कारकिर्द सुरु करणारे नारायण राणे यांचा राजकीय आलेख चढता राहिलाय. नगरसेवक, बेस्टचे अध्यक्ष त्यानंतर विधानसभेवर सलग तीनवेळा निवडून आले. 1999 मध्ये नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 2005 मध्ये नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करत वेगळी राजकीय वाटचाल सुरू केली. २०१९ मध्ये राणे यांनी आपला पक्ष भाजपात विलीन केला आणि त्यांच्यासह त्यांचे सर्व समर्थक भाजपात गेले.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. भारती पवार यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली. पण, या निवडणुकीत त्यांना अपयश आलं. यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीने त्यांना डावललं. त्यामुळे भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. हा विश्वास पात्र ठरत भारती पवार यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभवकरत दिल्ली गाठली. भारती पवार यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं असल्याने एक सुशिक्षित नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कपिल यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर गावाचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. पुढे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 आणि 2019 मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
भागवत कराड असे एकमेव आहेत, ते पहिल्यापासून भाजपात आहेत. ते निष्ठावंतांमध्ये मोडतात. 1995 मध्ये कराड यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. भागवत कराड हे ओबीसी समाजाचे नेते म्हणूनही ओळखले जातात.