मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील काही विद्यमान आमदार देव पाण्यात बुडवून बसल्याची चर्चा आहे. भाजपच्या १२२ आमदारांपैकी २५ आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. विधानसभेत मोठे यश मिळवण्याचा दृष्टीने भजपकडून हे धक्कातंत्र वापरण्यात येणार आहे. गेल्या चार महिन्यातील विविध सर्व्हे, स्थानिक राजकारण, बदलेली परिस्थिती लक्षात घेता जागा गमावण्याच्या भितीपोटी सुमारे २५ आमदारांना तिकीट नाकारून घरी बसवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पक्षाला डोईजड होणे, पक्षशिस्त मोडणे, विरोधात अनेक तक्रारी असणे, जनसंपर्क नसणे, सरकारच्या कामांच्या अंमलबजावणीत कमी पडणे, असे विविध निकष तिकीट नाकारतांना लावले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीतही अशा प्रकारे भाकरी फिरवण्याचे धाडस भाजपकडून करण्यात आले आणि ८ जागांवर भाजपाला यश देखील मिळाले होते. याच पार्श्वभूमीवर भाजप २५ विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
२२ सप्टेंबरला भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत येणार असून, त्यांच्याकडून याबाबत शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपला यामुळे दगाफटका बसू शकतो, अशीही शक्यता आहे. नाराज आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न दुसऱ्या पक्षाकडून होऊ शकतो. तसेच हे नाराज आमदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात, त्यामुळे भाजपला मोठी जोखीम घ्यावी लागणार आहे. ही जोखीम निवडणुकीत तारक ठरणार की मारक, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.