'हटाव लुंगी बजाओ पुंगी'पासून ते 'नेसा लुंगी, वाजवा पुंगी'

आजोबांनी 'हटाओ लुंगी'चा नारा दिला आणि आता नातू मात्र भर सभेत लुंगी नेसला

Updated: Oct 15, 2019, 10:46 PM IST
'हटाव लुंगी बजाओ पुंगी'पासून ते 'नेसा लुंगी, वाजवा पुंगी' title=

कृष्णात पाटील-दीपाली जगताप पाटील, झी २४ तास, मुंबई : सध्या लुंगी जबरदस्त ट्रेन्डिंग आहे. एकेकाळी ज्या पक्षानं 'लुंगी हटाव'च्या घोषणा दिल्या त्याच पक्षाचे नेते आणि तेही चक्क ठाकरे लुंगी घालून प्रचारसभेत दिसले. 'हटाव लुंगी बजाओ पुंगी'पासून ते 'नेसा लुंगी, वाजवा पुंगी'पर्यंतचा हा शिवसेनेचा प्रवास... आजोबांनी 'हटाओ लुंगी'चा नारा दिला आणि आता नातू मात्र भर सभेत लुंगी नेसला. राजकारणच ते... तिथे काहीही शक्य आहे म्हणा... वरळीतल्या सभेत आदित्य ठाकरेंना चक्क लुंगी नेसवण्यात आली. मतदारांचा सन्मान करत आदित्य ठाकरेंनी ही लुंगी नेसवूनही घेतली.

वरळी मतदारसंघात इतर भाषिकांना आकर्षित करण्यासाठी 'केम छो वरळी'सारखे बॅनर्स लागली होती. आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी लुंगी नेसली. यावर त्यांना प्रश्न विचारला त्यांनी 'वादच सर्वत्र दिसतात का?' असा प्रतिप्रश्न करत मद्रासी समाजानं आपला सन्मान केल्याची प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेच्या प्रचारात लुंगीबरोबर पुंगीही आलीय. शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारात दारुखाना भागातल्या दक्षिण भारतीयांच्या वस्तीत पुंगी वाजवण्यात आली. एकेकाळी मुंबईकराच्या रोजगारावर घाला घालण्याचा ठपका ठेवत दक्षिण भारतीयांना हाकलून लावण्याची भाषा करणारी बाळासाहेबांची शिवसेना आता आदित्यची शिवसेना झालीय. त्यामुळेच लुंगी आणि पुंगी प्रचारात आलीय... सध्या राजकारणात लुंगी ट्रेण्डिंग आहे, हे खरंच...