दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या वादानंतर अनिल देशमुख हे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गेले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. दुसरीकडे संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यासाठी अनिल देशमुख वर्षावर गेले असतील असंही बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी अनिल देसमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असावी अशीही एक शक्यता आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केल्यानंतर ते जास्त अडचणीत आले आहेत. एका कार्यक्रमात मुलाखत देताना अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी चुका केल्याने कारवाई आवश्यक होती, असा आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकला होता.
अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा किंवा देऊ नये, यावर काँग्रेसने आपलं कोणतंही स्पष्ट मत दिलेलं नाही, तर या आधी दिल्लीत संजय राऊत आणि शरद पवार यांची ३ तास चर्चा झाली आहे.