माजी मिसेस मुख्यमंत्र्यांना धक्का देण्याची ठाकरे सरकारची तयारी

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अँक्सिस बँकेत वळवण्यात आली होती

Updated: Dec 25, 2019, 03:56 PM IST
माजी मिसेस मुख्यमंत्र्यांना धक्का देण्याची ठाकरे सरकारची तयारी title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना धक्का देण्याची तयारी ठाकरे सरकारनं सुरू केल्याची चर्चा आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची ऍक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. ऍक्सिस बँकेत पोलिसांची दोन लाख खाती आहेत. वर्षाकाठी जवळपास ११ हजार कोटी रुपये बँकेत जमा होतात.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अँक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. फडणवीस यांच्या पत्नी ऍक्सिस बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे सरकारनं आता पोलिसांची खाती दुसऱ्या बँकेत वळवण्याचा निर्णय घेतल्यास अमृता फडणवीसांना मोठा धक्का ठरणार आहे. 

अमृता फडणवीस यांनी २००३ सालापासून ऍक्सिस बँकेमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा बँकेतला हा प्रवास एक्झिक्युटिव्ह कॅशिअर म्हणून सुरू झाला. सध्या त्या ऍक्सिस बँकेत व्हाईस प्रेसिडेन्ट (corporate head - west india) म्हणून काम पाहत आहेत. 

फडणवीस सरकारनं पोलिसांची खाती ऍक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर मोठी टीका झाली होती. यावर, स्पष्टीकरण देताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, केवळ माझी पत्नी ऍक्सिस बँकेत आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला नाही. काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने अशा खात्यांसाठी ज्या बँकांची निवड केली होती त्यात ऍक्सिस बँकेचाही समावेश होता. केवळ आमचं सरकार आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात आला, असं म्हटलं होतं.