विरोधकांचा 'उल्टा चष्मा', दादांच्या टीकेला दुसऱ्या दादांचं जशास तसं उत्तर

cm नेमके कुठे आहेत, असा सवाल चंद्रकांतदादांनी उपस्थित केला आहे

Updated: Dec 21, 2021, 07:31 PM IST
विरोधकांचा 'उल्टा चष्मा', दादांच्या टीकेला दुसऱ्या दादांचं जशास तसं उत्तर title=

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. यावरुन विरोधकांनी टीका केली. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सीएम नेमके कुठे आहेत असा सवाल उपस्थित केला होता. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. 

चहापानाच्या कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत चांगली आहे, ते आज वर्षा बंगल्यावर आले होते, दोन दिवसांपूर्वी विधीमंडळातही आले होते, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

दर आठवड्याला मुख्यमंत्री कॅबिनेट घेत आहेत, दहा-बारा विषय कॅबिनेटला मंजूर होत आहेत, त्या मंत्र्याकडून ती फाईल मुख्यमंत्र्याच्या सहिला जाते, मुख्यमंत्री सहि करतात, मुख्यमंत्री व्हिसीवर कोरोनाबद्दलच्या आढावा बैठक घेतात, सर्व कामकाज व्यवस्थित चाललेलं आहे. विरोधकांनी तशाच प्रकारचा जर चष्मा लावला आहे, त्यांना त्या चष्म्यातून तेच दिसत असेल तर त्याला काय करायचं, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची बैठक विधीमंडळात बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

ज्या व्यक्तीने हे आरोप केले आहेत, त्या व्यक्तीला आरोप करण्याशिवाय काहीही दुसरं सूचत नाही, आता काय तर राष्ट्रपती राजवट केव्हा लावायची एवढंच बाकी आहे, आता 170 आमदारांचा पाठिंबा असेल तर लोकशाहीत अशा पद्धतीने केंद्रातील सत्ताधारी पक्षातील राज्यातील प्रांतअध्यक्ष अशा प्रकाराचं वक्तव्य करत असतील, तर धन्य आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला.

सरकारला कॉन्फिडन्स नाही म्हणून ते आवाजी मतदानाने निवडणूक घेत आहेत असा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी विरोधकांनी अविश्वास ठराव दाखल करावा, सत्ताधारी पक्ष अविश्वास ठराव फेटाऴून लावेल, त्यांनी अविश्वास ठराव मंजूर करुन दाखवावा, असं आव्हान दिलं.

अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार आहे, लोकशाहीत उमेदवार असलाच पाहिजे, इतकं एकतर्फी राहून कसं चालेल असंही अजित पवार यांनी सांगितलं.