'फडणवीस दिल्लीला गेले तर मुनगंटीवारांना आनंद', अजितदादांची फटकेबाजी

देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अर्थमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. 

Updated: Mar 4, 2020, 07:23 PM IST
'फडणवीस दिल्लीला गेले तर मुनगंटीवारांना आनंद', अजितदादांची फटकेबाजी title=

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अर्थमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. 'फडणवीस तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता. राम नाईक साहेब वरती दिल्लीमध्ये सांगा फडणवीस चांगले साहित्यिक आहेत, त्यांना दिल्लीला घ्या. फडणवीस दिल्लीला गेले तर याचा आम्हा २८८ लोकांना फायदा होईल आणि मुनगंटीवार यांना जास्त आनंद होईल', असा चिमटा अजित पवारांनी काढला.

'६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडत असताना विरोधी पक्ष जोरदार घोषणा देत होता, पण फक्त एक जण हेडफोन लाऊन माझं भाषण ऐकत होता, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. योग्यवेळी पुस्तक प्रकाशीत झाले आहे, याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होत आहे. सामान्य माणसातल्या अर्थमंत्र्याला हे पुस्तक उपयोगी पडेल. अर्थमंत्री म्हणून दिशा आणि हेतू स्पष्ट असावा लागतो. विरोधी पक्षाने गोंधळ न घालता अर्थसंकल्प सादर करुन दिला पाहिजे,' असं अजित पवार म्हणाले.

'देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षातच अधिक खुलतात, तुम्ही विरोधी पक्षातच राहावे. सदस्यांसाठी अशी ग्रंथसंपदा निर्माण करा,' असा सल्ला विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना या कार्यक्रमात टोला हाणला. पुढची ५-१० वर्ष अशीच पुस्तकं लिहा, म्हणजे आम्ही अर्थसंकल्प चांगल्या पद्धतीने सादर करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

'पुढची ५-१० वर्ष अशीच पुस्तकं लिहा', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला