Air Pollution Delhi vs Mumbai: हिवाळ्याची चाहूल लागताच भारतामधील अनेक मोठ्या शहरांमध्ये प्रदुषणाची समस्या अधिक गंभीर होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईबरोबरच दिल्लीमधील प्रदुषणाची चर्चा अगदी प्रसारमाध्यमांपासून ते सोशल मीडियावरही दिसून येत आहे.
रविवारी देशाच्या राजधानीच्या शहरातील हवेचा दर्जा हा फारच वाईट म्हणजेच व्हेरी पूअर कॅटेगरीमधील होता. रविवारी दिल्लीतील हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स हा 302 इतका होता. मुंबईमधील परिस्थिती दिल्लीच्या तुलनेत बरी होती असं म्हणता येईल. मुंबईतील रविवारीची हवेची शुद्धता ही मध्यम स्वरुपाची म्हणजे मॉडरेट होती. मुंबईतील हवेचा एअर क्विलिटी इंडेक्स 132 इतका होता.
एअर क्विलिटी इंडेक्स 0 ते 50 मध्ये असेल तर त्याला उत्तम हवा म्हणतात. 51-100 दरम्यान एअर क्विलिटी इंडेक्स असल्यास ती हवा शुद्धेच्या दृष्टीने समाधानकारक असते असं म्हणतात. तर 101 ते 200 दरम्यान एअर क्विलिटी इंडेक्स असेल तर हवेचा स्तर हा मॉडरेट, 201-300 दरम्यान एअर क्विलिटी इंडेक्स असल्यास हवेचा स्तर वाईट असतो. 301-400 दरम्यान एअर क्विलिटी इंडेक्स हा व्हेरी पूअर म्हणजेच फार वाईट समजला जातो. 401-500 दरम्यान एअर क्विलिटी इंडेक्स असलेली हवा ही अत्यंत वाईट असते. तर 500 हून अधिक एअर क्विलिटी इंडेक्स असल्यास या हवेला प्रचंड प्रदुषित हवा असं म्हणतात. मुंबई आणि दिल्लीमध्ये मागील 3 दिवसात काय परिस्थिती होती पाहूयात...
शनिवारी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या हवेचा स्तर हा 248 इतका होता. पुढील काही दिवसांमध्ये हवेचा स्तर हा फार वाईट दर्जापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये एअर क्विलिटी इंडेक्स 301 ते 400 दरम्यान असू शकतो. यामुळेच हवेचा दर्जा स्वच्छ राहण्यासंदर्भात काम करणाऱ्या कमिशन ऑफ एअर क्वालिटी मॅनेजमेंटच्या उपसमितीने 11 कलमी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीतील हवेचा स्तर अधिक बिघडू नये यासाठी ग्रेडेच रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनची दुसरी मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेमध्ये कोळसा, लाकडू जाण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रीक इंधनाच्या वापरासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. रोज रस्ते स्वच्छ केले जाणार आहे. वाहतूक कोंडी होऊन प्रदूषण होऊ नये म्हणून
पोलिसांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे मुंबईमध्ये 21 ऑक्टोबर रोजी हवेचा दर्जा म्हणजेच एअर इंडेक्स क्वालिटी 132 इतकी होती असं सिस्टीम ऑफ एअर क्विलीटी अॅण्ड वेदर फोरकार्टींग अॅण्ड रिसर्चने म्हटलं आहे. दुसरीकडे सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डाने मुंबईतील हवेचा स्तर हा 155 इतका होता असं म्हटलं आहे.
20 ऑक्टोबरला दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स 190 इतका होता. तर मुंबईत हाच आकडा 200 हून अधिक होता. 19 तारखेला दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स 121 इतका होता. त्यापूर्वी म्हणजे बुधवारी ही आकडेवारी 129 तर मंगळवारी 89 इतकीच होती. दिल्लीतील ही आकडेवारी समाधानकारक आहे.
दुसरीकडे मुंबईमध्ये मागील आठवड्यात हवेचा दर्जा म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स सरासरी 156 इतका होता. म्हणजेच मागील आठवड्यात खरोखरच दिल्लीपेक्षा मुंबईतील हवेचा स्तर फारच वाईट होता.