अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरण, तपासात तिच्या आईमुळेच अडथळे

जिया खान मृत्यू प्रकरणात न्यायालयाने जियाच्या आईला फटकारलं

Updated: Sep 28, 2022, 08:11 PM IST
अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरण,  तपासात तिच्या आईमुळेच अडथळे title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई :  बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या  (Jiah Khan) आईने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नुकतीच फेटाळून लावली आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ला निर्देश द्यावेत अशी मागणी जिया खानची आई राबिया यांनी केली होती. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने खटला लांबणीवर टाकण्यासाठी अशी याचिका दाखल केल्याबद्दल राबिया यांना चांगलेच फटकारलं. 

न्यायालयाने काय म्हटलं?
अशा प्रकारे याचिका करणे म्हणजे हा खटला लांबणीवर टाकण्याचे स्पष्ट संकेत आहेत. याचिकाकर्त्याचा संपूर्ण दृष्टीकोन या न्यायालयाकडून खटल्याला सामोरे न जाता, या प्रकारचा दृष्टीकोन कायद्याच्या योग्य प्रक्रियेला बाधा आणणारा दिसतो. अशा प्रकारच्या वर्तनाचा आम्ही निषेध करतो.  याच कारणासाठी याचिकाकर्त्याकडून कारवाईची पुनरावृत्ती झाल्यास यापुढे याचिकाकर्त्यावर दंड आकारला जाईल अशा कडक शब्दात न्यायालयाने राबियाला ताकिद दिली आहे. 

जिया खान मृत्यू प्रकरण
जिया खान 3 जून 2013 रोजी जुहू येथील तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत सापडली होती. एका आठवड्यानंतर म्हणजे 10 जून रोजी तिची आई राबिया यांनी पोलिसांना एक चिठ्ठी सादर केली होती. ही चिठ्ठी रियाच्या बेडरूममध्ये सापडलेली सुसाईड नोट (Suicide Note) असल्याचा दावा तिच्या आईने केला होता. या चिठ्ठीत तिच्या मृत्यूसाठी अभिनेता सूरज पांचोलीला जबाबदार धरण्यात आलं.  तेव्हापासून, अभिनेत्यावर खानच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात आहे. 

याप्रारकरणी राबियाने दावा केला की तिच्या मुलीची हत्या करण्यात आली होती आणि मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई पोलिसांच्या तपासावर राबिया समाधानी नव्हती म्हणून तिने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 3 जुलै 2014 रोजी तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला होता. मात्र त्यानंतरही राबिया हे प्रकरण अमेरिकेतील एफबीआयकडे सोपवण्यासाठी याचिका केली होती.