Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी रोजी दहिसरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर आरोपी मॉरिस नोरोन्हाने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या हत्येनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं. तर दुसरीकडे विनोद घोसाळकर यांनी आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र आता अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अभिषेक घोसाळकर यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी अभिषेक घोसाळकर यांनी बाहेर फिरायला जाण्याची योजना आखली होती. मात्र, त्याआधीच अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे घोसाळकर कुटंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दहा वर्षांपूर्वी तेजस्वी यांचे अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत लग्न झालं होतं. मात्र आता अभिषेक घोसाळकर जगात नसल्याने त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर भावूक झाल्या आहेत. व्हॅलेटाईन दिनानिमित्त तेजस्वी यांनी अभिषेक घोसाळकर यांच्याच फेसबुक पेजवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीला तेजस्वी यांनी हमारी अधुरी एक कहाणी हे गाणं मागे जोडलं आहे.
काय म्हटलंय तेजस्वी घोसाळकरांनी?
"स्वर्गात असलेल्या माझ्या प्रिय नवऱ्यासाठी. मला तुमच्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचं होतं. परंतु, आता मला समजलं की तुम्हीच तुमचं संपूर्ण आयुष्य माझ्याबरोबर घालवणार आहात. मला माहितेय की तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम केलंत आणि आता पुन्हा भेटेपर्यंत तुम्ही वरूनही माझ्यावर असेच प्रेम करत राहाल. लग्नाच्या वाढदिवसाच्या स्वर्गीय शुभेच्छा. मला तुमची फार आठवण येते," असे तेजस्विनी घोसाळकर यांनी फेसबुक स्टोरीमध्ये म्हटलं आहे. या कॅप्शनसोबत तेजस्वी घोसाळकर यांनी अभिषेक घोसाळकरांसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.
अभिषेकची विश्वासघाताने हत्या झाली - विनोद घोसाळकर
"माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा. पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, असे विनोद घोसाळकर यांनी म्हटलं आहे.