सायनमध्ये नाल्यात पडून बालकाचा मृत्यू

स्थानिकांनी अमितला नाल्यातून बाहेर काढून तातडीने सायन रुग्णालयात नेले.

Updated: Jul 15, 2019, 08:00 PM IST
सायनमध्ये नाल्यात पडून बालकाचा मृत्यू title=

मुंबई: गोरेगावमध्ये गटारात दोन वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत आणखी एक अपघात घडला आहे. सायन परिसरात सोमवारी अमित मुन्नालाल जैसवार या सात वर्षांच्या मुलाचा नाल्यात पडून मृत्यू झाला. येथील पिवळा बंगला परिसराती परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. 

प्राथमिक माहितीनुसार, अमित नाल्याच्या काठावर खेकडे पकडत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो थेट नाल्यात जाऊन कोसळला. अमित बुडत असल्याचे पाहून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अमितच्या नाकातोंडात बरेच पाणी गेले होते. स्थानिकांनी अमितला नाल्यातून बाहेर काढून तातडीने सायन रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे मुंबईतील उघडी गटारे आणि नाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

काही दिवसांपूर्वीच गोरेगाव येथे दोन वर्षांचा दिव्यांश गटारात वाहून गेला होता. दिव्यांशला शोधण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले होते. मात्र, अनेक दिवसांच्या शोध मोहीमेनंतरही दिव्यांशचा मृतदेह सापडू शकला नव्हता. त्यामुळे लोकांमध्ये महानगरपालिकेविषयी रोष निर्माण झाला आहे.